सोरतापवाडी (वार्ताहर) – पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत शुक्रवारी (ता. १२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरामध्ये इस्त्री करीत असताना एका ४ वर्षाच्या चिमुकल्याचा वायरचा करंट लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
शिवराज अजय आढाव असे या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने नायगाव ,पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरामध्ये इस्त्री करण्याचे काम सुरु होते.
यावेळी शिवराज हा घरात खेळत असताना त्याचा इस्त्रीच्या वायरला पाय लागला. या घटनेत त्याला जोरदार धक्का बसला. विजेच्या झटक्याने बेशुद्ध झालेल्या शिवराज याला उपचारासाठी लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे सांगितले. येथील उद्योजक राजेंद्र आढाव यांचा शिवराज हा पुतण्या होता.