नवी दिल्ली :- आगामी लोकसभा निवडणूक आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आज अचानक आपल्या राज्यांतील प्रभारींची नियुक्ती केली असून त्यानुसार मध्य प्रदेशची जबाबदारी आता धर्मेंद्र यादव यांच्याकडे तर तेलंगणाची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुका होत असलेल्या राजस्थानचे प्रभारी म्हणून प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर छत्तीसगढमधील प्रभारी म्हणून ओमप्रकाश माथुर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रभारी म्हणून नियुक्ती दिली जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत भाजपचे गुजरातमधील नेते नितीन पटेल यांचेही नाव होते. त्यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी नियुक्त केले जाण्याची अगोदर चर्चा होती. मात्र पटेल यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. ते प्रल्हाद जोशी यांच्यासोबत काम करतील असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपकडून दोनच दिवसांपूर्वी काही प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार झारखंडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री जी. किशन रेड्डी तर आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.