पुणे- शहरात पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिणे तसेच हातातील सोन्याच्या बांगड्या कटरने कापून चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. यातील काही टोळ्या कारागृहात असल्यातरी हे प्रकार थांबलेले नाहीत. अशाच प्रकारे बसमधून बांगडी कट करुन पळून जाणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल तीन लाख वीस हजारांचे सोने हस्तगत करण्यात आला आहे.
अमित नाना चव्हाण (रा. ससाणे नगर हडपसर) आणि शुभम सत्यवान ढोले (रा . चव्हाण वस्ती थेऊर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीत पोलिस अंमलदार अनिल कुसळकर, मनोज भोकरे, शिवाजी सरक असे पेट्रोलिंग करीत होते. त्यांना पीएमपीबसमधून उतरुण घाईगडबडीत पळताना दोघेही आढळले. त्यांनी संशयावरुन दोघाही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी पीएमपी बसमधून एका महिलेची सोन्याची बांगडी कटरने चोरल्याची उघड झाले.
त्यांच्याकडे 20 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या मिळून आल्या. त्यांच्याकडून स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेला एक गुन्हाही उघडकीस आला. यातील अमित चव्हाण हा सराईत असून त्याच्यावर मुंढवा, हडपसर, स्वारगेट आदी पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारचे सात गुन्हे दाखल आहेत. तर शुभम हा त्याचा नवीन साथीदार आहे.
ही कामगिरी उप-आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस अंमलदार मोहन काळे, सुधीर घोटकुले, अनिल कुसालकर, मनोज भोकरे, संजय वणवे, शिवाजी सरक, किरण तळेकर यांचे पथकाने केली.