निवडणूक निर्णय अधिकारी डुडी यांची माहिती
अवसरी – आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान साहित्य वाहून नेण्यासाठी अवसरी खुर्द येथील निवडणूक मुख्य कार्यालयातून 111 वाहने मतदान केंद्राकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
मतदान दिवशी सोमवारी (दि. 21) 1 हजार 680 आणि राखीव 400 कर्मचारी असे एकूण 2 हजार 100 कर्मचारी काम पाहणार आहेत. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट असे एकूण 1 हजार 8 मशीन आणि राखीव 213 एकूण 1 हजार 221 मशीन तयार आहेत. मतदान साहित्य वाहून नेण्यासाठी 111 वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमा जोशी यांनी दिली. मतदान केंद्राची संख्या 336 असून, केंद्रावर एकूण 2 लाख 83 हजार 521 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 लाख 45 हजार 985 पुरुष तर 1 लाख 37 हजार 540 महिला मतदार आहेत. 336 मतदान केंद्रासाठी 33 क्षेत्रीय अधिकारी आणि 3 राखीव क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतमोजणी गुरुवारी (दि. 24) सकाळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अवसरी येथे होणार असून, चौदा टेबलवर चोवीस फेऱ्या होणार आहेत. याची 56 अधिकारी व कर्मचारी व्यवस्था पाहणार आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक कार्यालय असलेल्या अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून 336 मतदान केंद्रावर जाणारे कर्मचारी मतदान पेट्यांसह रवाना झाले आहेत.