खेडमध्ये पावसाचा काहीकाळ व्यत्यय : प्रशासनाच्या पूर्वतयारीमुळे अडचणींवर मात
राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील 379 मतदान केंद्रावर सोमवारी (दि.21) मतदान होणार आहे. निवडणुकीच्या मतदानासाठी लागणारे साहित्य, कर्मचारी असा लवाजमा रविवारी (दि. 20) राजगुरूनगर येथून ज्या-त्या मतदान केंद्रावर रवाना करण्यात आला. खेड तालुक्यात शनिवार (दि. 19) पासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने प्रशासनाच्या कामात काहीकाळ व्यत्यय आला. मात्र पूर्व तयारीनिशी उतरलेले प्रशासनाने निवडणुकीचा लवाजमा ज्या-त्या केंद्रावर पोहोचविण्यात यश मिळवले.
या निवडणुकीत तब्बल दोन हजार कर्मचारी काम करीत आहेत. राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलातून मतदानाचे साहित्य ज्यात्याकेंद्रावर नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले. रविवारे (दि.20) रोजी सकाळी जोरदार पाऊस सुरु होता. या पावसात सर्व नेमलेले कर्मचारी वाहने ठरलेल्या वेळेत आल्याने कोणताही अडथळा झाला नाही.
निवडणुकीचे साहित्य आणि कर्मचारी घेऊन जाणाऱ्या एसटी बसची चाके जोरदार पावसामुळे चिखलात रुतून बसल्याने काही काळ अडथळा झाला. जोराचा पाऊस आणि थंड हवा यामुळे कर्मचाऱ्यांची काहीशी धांदल झाली. मात्र, निवडणुकीच्या कामाचे कर्तव्य समजून मतदानाचे साहित्य पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखिखाली मतदार केंद्रांवर पाठविण्यात आले. निवडणूक निरीक्षक पियुष मुखर्जी, निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली हे या निवडणुकीच्या प्रत्येक घटकावर नजर ठेवून आहेत. निवडणूक पारदर्शक आणि शांततेत होण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आली आहे.
3 लाख 27 हजार 262 मतदार बजावणार हक्क –
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार 3 लाख 27 हजार 262 आहे.पैकी 1 लाख 70 हजार 940 पुरुष तर 1 लाख 56 हजार 318 महिला तर इतर चार मतदार आहेत. राजगुरूनगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील सखी मतदान केंद्र क्रमांक 142 या केंद्रात सर्व महिला अधिकारी कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. राजगुरूनगर येथील मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून मतदान केंद्र क्रमांक 145 बनविण्यात येणार आहे. तालुक्यातील 38 मतदान केंद्रावर वेब कास्टींग कॅमेरे बसवले असून मतदानाचे दिवसभर लाईव्ह प्रेक्षपण सुरू ठेऊन निगराणी ठेवली जाणार आहेत.
11 मायक्रो निरीक्षकांचे पथक कार्यरत –
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाची 11 मायक्रो (सुक्ष्म) व्निरीक्षक पथके कार्यरत राहणार आहेत. खेड पोलीस ठाणे हद्दीत 107 गावातील 115 ठिकाणी 188 मतदान केंद्रासाठी आठ पोलीस पथके, 18 क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी स्वंतत्र पोलीस देण्यात आले आहेत. चाकण पोलीस ठाण्यातंर्गत 66 गांवाची 73 ठिकाणची 140 मतदान केंद्रासाठी सहा पोलीस पथके कार्यरत राहणार आहे. आळंदी पोलीस ठाण्यातंर्गत 10 गावांची 15 ठिकाणी 45 मतदान केंद्र असून 4 पोलीस पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. दीघी पोलीस ठाण्यातंर्गत सहा मतदान केंद्रासाठी एक पोलीस पथक ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या अहवालानुसार राजगुरूनगर, वाडा, चास, वाशेरे, काळुस या गावातील मतदान केंद्रे संवेदनशील असल्याने या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
33 क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत लक्ष
मतदान केंद्रावर 33 क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेऊन दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र यत्रंणा तयार ठेवण्यात आली आहे. मतदान यंत्राणा सुरळीत चालवण्यासाठी राखीव बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट यत्रंणा सज्ज ठेऊन 15 ते 20 मिनिटांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यत्रंणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतदानाची आकडेवारी मिळवण्यासाठी ज्या मतदानकेंद्रांवर नेटवर्किंग नाही अशा ठिकाणी स्थानिक पोलीस पाटीलांची मदत घेण्यात आली आहे.
“या’ 38 केंद्रांवर कॅमेऱ्याद्वारे लक्ष
वाफगाव, राजगुरुनगर, पाईट, शिरोली, रेटवडी, कनेरसर, दावडी, वराळे, म्हाळूंगे, खराबवाडी, नाणेकरवाडी, चाकण, राक्षेवाडी (चाकण), मेदनकरवाडी, रासे, काळुस, पोटवडेवस्ती आणि पवळेवाडी (काळुस), दौडंकरवाडी, बहुळ, वडगाव घेनंद, कुरुळी, निघोजे, चिबंळी, आळंदी देवाची, च-होली खुर्द, धानोरे, मरकळ, चास, कडुस या 27 गावातील 38 मतदानकेंद्रांवर कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.
त्या ठिकाणी पोलीस पाटलांची मदत
मतदान केंद्रात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवार प्रतिनिधीसमोर 50 मतांचा मोफपोल घेतला जाणार आहे. ज्येष्ठ नागरीक महिला तसेच दिव्यांग व्यक्ती साठी मतदान केंद्रावर माध्यमिक शालेय विद्यार्थी, आरोग्य सेवेतील आशा वर्कर महिला आणि अगंणवाडी कार्यकर्ती उपस्थित राहणार आहे. गावचे पोलीस पाटील यांना मतदान होईपर्यत दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राजगुरुनगर येथील तालुका क्रीडा संकुलावरुन मतदान केंद्रावर जाण्यासाठी 48 एसटी बसेस 5 मिनी एस.टी बसेस, 27 जीप या वाहनातून मतदानाचा लवाजमा पाठवण्यात आला. गुरुवारी (दि. 24) राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात सकाळी 8 वाजता 14 टेबलवरुन 29 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे, तर एक टेबलावर टपाली मतमोजणी करण्यात येणार आहे.
– संजय तेली निवडणूक निर्णय अधिकारी