ओतूर बसस्थानकाजवळ घटना : सीसीटीव्ही फुटेज आले समोर
ओतूर – जुन्नर तालुक्यातील ओतूर बसस्थानकावर रुग्णवाहिका वळवताना रुग्णवाहिके खाली शनिवारी (दि. 1) एक वृद्ध दोनदा चिरडा गेला होता. त्यांचा पुणे येथे उपचारादरम्यान गुरुवारी (दि. 6) मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रज्जाक मगन मुंढे (वय 65 रा. ओतूर) असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर कुणाल तुकाराम डुंबरे (रा. डुंबरवाडी, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रुग्णवाहीका चालकाचे नाव आहे. जमिर बाबुलाल मुंढे (रा. घोडेगाव, ता.आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, रुग्णवाहिका चालक ओतूर बसस्थानकावर रुग्णावाहीका वळवून नेताना मागच्या बाजूने मागे पायी चाललेल्या रज्जाक मुंढे यांना धडक देवून खाली पाडून त्यांना रुग्णवाहिकेने दोनदा चिरडले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्याना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रूग्णालयात व नंतर पुणे येथील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले;
मात्र उपचारादरम्यान त्यांचा (दि. 6) मृत्यू झाल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली. दरम्यान, ओतूर पोलीस ठाण्यात (दि. 9) फिर्याद दाखल केली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.