मुंबई – आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस असल्यामुळे सर्व शिवसैनिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिकांनी फ्लेक्स लावत त्यांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळते. नुकत्याच सामनासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या जन्म दिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सरकार बनवले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील काही आमदारांनी जात आपला वेगळा गट बनवला आणि भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले. आता एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख पक्षप्रमुख असा न करता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा केल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांनी यावेळी पक्षप्रमुख हा शब्द टाळल्याने सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदेंसह इतर आमदारांनी देखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव साहेब ठाकरेंना वाढदिवसाचे हार्दिक अभिष्टचिंतन. त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही देवा कडे प्रार्थना.@OfficeofUT
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) July 27, 2022