जिल्ह्यातील आठ गावांचा होणार शाश्‍वत विकास

ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनमध्ये निवड : गावांचा 30 कोटींचा विकास आराखडा तयार

नगर – ग्रामीण भागाचा शाश्‍वत विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनमध्ये नगर जिल्ह्यातील आठ गावांची निवड झाली आहे. गावमधील आरोग्य, शिक्षण, शेती, व्यवसाय व गुणवत्तापूर्णक विकास करण्यासाठी हे मिशन प्रभावी ठरणार आहे. दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना दारिद्य्र रेषेच्या वर आणणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा उद्देश असून कर्जत व जामखेड या दोन तालुक्‍यातील ही आठ गावे आहेत.

राज्यामध्ये नागरी भागात प्रगती झाली असली तरी ग्रामीण भागात या प्रगतीचा वेग अजूनही मंदावलेला आहे. सामाजिक दृष्ट्या मागास खेड्याचा विकास करण्यासाठी विविधस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तरीही अजूनही अनेक आव्हानांवर तोडगा काढावयाचा आहे. राज्यातील खासगी आणि सार्वजनिक कंपन्या तसेच वित्तीय संस्था यांच्या कंपनी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून राज्यातील 1 हजार गावांचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही गावे सक्षम बनवण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी या अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरात केली जाणार आहे.

या अभियानात नगर जिल्ह्यातील आठ गावांची निवड झाली असून त्या गावांत सर्व विभागाच्या योजना राबविण्यात येणार आहे. कर्जत तालुक्‍यातील चांदबुर्द्रेक, औटीवाडी, बेलगाव, बजरंगवाडी तर जामखेड तालुक्‍यतील धामणगाव, सावरगाव, डोनगाव व घोडेगाव या आठ गावांची निवड झाली असून या गावांचा विकास आराखडा देखील तयार झाला आहे. सुमारे 30 कोटींचा हा आरखडा असून तीन ते साडतीन कोटी एका गावा विकास आराखडा असल्याचे सांगण्यात आले आहे.

शासनाकडून या गावांना 10 लाख रुपये मिळणार असून त्यानंतर सर्व विभागाच्या योजना या गावात पूर्ण ताकदीने व प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यापूर्वी या गावांना योजनांचा लाभ मिळत होता. परंतु तो जिल्ह्यातील सर्व गावांच्या समप्रमाणात. पण आता या गावात एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांना लाभ येण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अभियान परिषद स्थापन करण्यात आली आहे. गावविकास आराखडा तयार करून त्या गावात जिल्ह्यातील सर्व योजना जोडण्यात येणार आहे. त्या विकास आराखड्याचा प्रगती आढावा घेतला जाणार आहे. या विकास आराखड्याला जिल्हा अभियान परिषद मंजुरी देणार असून अंमलबजावणीसाठी सर्व योजनांचा समन्वय करणार आहे.

ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनची उद्दिष्टे
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पिकांच्या प्रति हेक्‍टरी उत्पादनात सुधारणा करणे, कुटुंबांना दारिद्य्ररेषेवर आणणे, युवकांना कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करणे, सर्व गावांमध्ये डिजिटल संपर्क यंत्रणा स्थापित करणे, सर्व कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे, गावांमध्ये सुरक्षित पाणीपुरवठा करणे, बालमृत्यू दरात लक्षणीय घट करणे, सर्व गावांमध्ये आरोग्यविषयक व स्वच्छता दर्जा सुधारणे, शुद्ध पाणीपुरवठा करणे.

ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनची उद्दिष्टे
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पिकांच्या प्रति हेक्‍टरी उत्पादनात सुधारणा करणे, कुटुंबांना दारिद्य्ररेषेवर आणणे, युवकांना कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करणे, सर्व गावांमध्ये डिजिटल संपर्क यंत्रणा स्थापित करणे, सर्व कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे, गावांमध्ये सुरक्षित पाणीपुरवठा करणे, बालमृत्यू दरात लक्षणीय घट करणे, सर्व गावांमध्ये आरोग्यविषयक व स्वच्छता दर्जा सुधारणे, शुद्ध पाणीपुरवठा करणे.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील सर्व गावे
ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनमध्ये निवड करण्यात आलेली नगर जिल्ह्यातील आठही गावे ही पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या मतदारसंघातील आहे. अर्थात पाच ते सहा तालुक्‍यातून गावांची निवड करणे अपेक्षित असताना अन्य तालुक्‍यांना डावलून केवळ कर्जत व जामखेड या दोन तालुक्‍यातून आठ गावे घेतल्याने जिल्हा परिषद सदस्यांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.