राजगुरूनगर -भारत सरकारच्या कांदा-लसूण संशोधन केंद्राने कांदा साठवणुकीवर ‘कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ हे अतिशय प्रभावी संशोधन तीन वर्षाच्या मेहनतीतून विकसित केले आहे. नैसर्गिक कांदा चाळ, कोल्ड स्टोरेज यांच्यातील विविध प्रयोग आणि त्यातील निरीक्षणे लक्षात घेऊन “कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ कांदा उत्पादक ते ग्राहक या साखळीतील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त ठरणार आहे.
कांद्यावर संशोधन करणारे राजगुरुनगर येथील कांदा-लसूण केंद्र व चाकण येथील कला बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नातून कमी खर्चात कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. नैसर्गिक कांदा चाळ, कोल्ड स्टोरेज मधुनही काही प्रमाणात कांदाचे नुकसान होत होते. कांद्यावरील नुकसान कमी करण्यासाठी कांदा लसूण केंद्राचे संचालक डॉ. मेजर सिंग, संशोधक डॉ. कल्याणी पाटी, डॉ. राजीव काळे यांनी “कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ ची संकल्पना तयार केली.
यासाठी चाकण येथील कला बायोटेक प्रा. लि. या कंपनीच्या मदतीने दोनशे टन क्षमतेचे स्टोरेज स्ट्रक्चर तयार करण्यात आले. या स्टोरेजमध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याची साठवणूक केली असून कांद्याची नुकसान (सड) शून्य टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे पुढील काळात कांद्याच्या साठवणीसाठी तयार झालेले कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ फायदेशीर ठरणार असल्याचे डॉ. मेजर सिंग यांनी सांगितले.
काही वर्षांपासून वातावरणातील मोठा बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, कांदा पिकांवर होणारा अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर अशा कारणांमुळे पिकवलेला कांदा जास्त काळ टिकत नाही. त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च आणि बाजारमूल्य यांची योग्य सांगड बसू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रावर साठवणुकीबाबत उपाययोजनांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
त्यानुसार दीर्घकाळ कांद्याची साठवणूक करण्यासाठी कमी खर्चात कांदा साठवणुकीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र सध्या सर्रास दिसून येते. हे नुकसान टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानातून विकसित केलेली “कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ ची पद्धत शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असल्याचे कांदा-लसूण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे यांनी सांगितले.
‘हे’ संशोधन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार…
कांद्याचे उत्पादन घेत असताना मोठा भांडवली खर्च शेतकऱ्यांना उभा करावा लागतो. यासाठी कांद्याचे उत्पादन वाढवून चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतात; मात्र बाजारभावाच्या चढ-उतारामुळे कांद्याची साठवणूक गरजेची असते. यासाठी कांदा-लसूण केंद्र व कला बायोटेक प्रा. लि. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांतून “कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ तयार करण्यात आले.
या तंत्रज्ञानातून कांद्याची साठवणूक केल्यास कांद्याची नुकसान कमी प्रमाणात होते व कांदा साठवणुकीतून बाहेर काढल्यानंतरही दीर्घकाळ कांदा टिकत आहे. यासाठी प्रतिकिलो प्रतिमहिना 60 पैसे खर्च येतो. हा खर्च लक्षात घेता नैसर्गिक कांदा चाळ व कोल्ड स्टोरेज यांवर होणाऱ्या खर्च व नुकसान यावर “कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर’ हे तंत्रज्ञान फायदेशीर असल्याचे कांदा-लसूण केंद्राचे संशोधक कल्याणी माटी यांनी सांगितले.