पुणे – राज्यात करोनाची दुसरी लाट येणार असल्याने खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मात्र करोनाचा विसर पडल्याप्रमाणे पुणेकरांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे दिवाळी सुरू होण्यापूर्वी बाजारपेठांतील गर्दीने उच्चांक गाठल्याचे आशादायी चित्र शुक्रवारी दिसून आले.
प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दिवाळीनमित्ताने मार्चपासून बंद असणाऱ्या बाजारपेठांना झळाळी मिळत आहे. नागरिकांनी बेशिस्तपणे उभ्या केलेली वाहने, रस्त्याच्या कडेला विक्रेत्यांचे स्टॉल आदीमुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली होती.
मंडई, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता यांसह उपनगरांतील विविध भागांत खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेक रस्त्यांच्या कडेला उभ्या असणाऱ्या विक्रेत्यांकडे खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी बेशिस्तपणे वाहने उभी केली होती. यात चारचाकी वाहनांची सर्वाधिक भर पडली. यासह मिठायांची दुकाने, फराळाच्या पदार्थांची दुकाने आणि कापड बाजार देखील गर्दीने फुलला होता.