- करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- दि. 25 नोव्हेंबरनंतर महापालिका राबवणार मोहीम
पुणे – दिवाळीतील गर्दीमुळे डिसेंबर-जानेवारीमकरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य विभागाने वर्तवली आहे. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात तापाचे रुग्ण आढळणाऱ्या भागांत विशेष करोना तपासणी केली जाणार आहे. दि. 25 नोव्हेंबरपासून महापालिका प्रशासन ही मोहीम राबवणार आहे.
या मोहिमेसाठी खासगी हॉस्पिटलची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणाही विकसित केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. शहरात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा कमी झाला आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुन्हा अनलॉक होताना मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. यामुळे करोनाचा किती प्रसार होईल, हे समजण्यास किमान दोन आठवड्यांचा कालावधी जाणार आहे. त्यानंतरच नवीन बधितांची संख्या समोर येणार असली, तरी महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 25 नोव्हेंबरपासून शहरात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
अशी असणार मोहीम
शहरातील प्रत्येक खासगी रुग्णालयाने त्यांच्याकडे आलेल्या तापाच्या रुग्णाचे नाव, संपर्क क्रमांक आणि पत्ता महापालिकेस तातडीने कळवायचा आहे. या आधारावर तापाचे सर्वाधिक रुग्ण असलेला भाग तत्काळ निश्चित करून घरोघरी विशेष तपासणी केली जाईल. संबंधित रुग्णांच्या करोना चाचण्याही करण्यात येणार आहेत. ही माहिती महापालिकेस कळवण्यासाठी स्वतंत्र लिंक सर्व डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.