पिंपरी-चिंचवड पालिकेचे महापालिकेत रूपांतर?
पुणे, दि. 19 – पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन असून नजिकच्या काळातच याबाबतचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मध्यंतरी ही नगरपालिका पुणे महापालिकेत सामील करून टाकण्याच्या निर्णयाबाबत चर्चा सुरू होती. परंतु या पालिकेने त्याला कडाडून विरोध केला.
आता महानगरपालिका करण्याच्या योजनेचा विचार मंत्रिमंडळाच्या पातळीवर करण्यात येत असून येत्या 2-3 आठवड्यात याबाबतचा निर्णय जाहीर होईल, असा अंदाज आहे.
न्यूनगंडाची भावना सोडून विकास कार्यात भाग घ्या
नागपूर – अल्पसंख्याक आणि कमकुवत वर्गाने न्यूनगंडाची भावना काढून देशातील विकास कार्यात अहमहमिकेने भाग घ्यावा व स्वतः बरोबर राष्ट्राची प्रगती साधावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग यांनी येथे अल्पसंख्याक आणि कमकुवत वर्गाच्या नागपूर विभागीय संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी केले.
पंतप्रधानांच्या 20 कलमी कार्यक्रमामुळे शतकानुशतके शोषण व पिळवणूक झालेल्या ह्या कमकुवत आणि दीनदुबळ्या समाजाच्या उत्थानाच्या कार्यास जरी प्रारंभ झाला असला तरी या कार्याचा वेग वाढविणे अगत्याचे आहे, असे मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग म्हणाले.