लक्षवेधी | उद्धवजींची तिरंदाजी

– हेमंत देसाई

महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होणार असल्याची पुडी सोडण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यावेळी मोदींनी उद्धवजींसमोर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याचा प्रस्ताव ठेवला, अशी बातमी एका वृत्तपत्राने दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास, मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडेच राहील आणि भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील. 2022 मधील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही सेना-भाजप एकत्र लढवतील. 2024च्या लोकसभा निवडणुकांत भाजप तीस जागा लढवेल आणि शिवसेनेला अठरा जागा दिल्या जातील. तर विधानसभा निवडणुकीत 144-144 असे समसमान वाटप होईल आणि जो जास्त जागा जिंकेल, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असा म्हणे हा प्रस्ताव आहे. असे जर खरेच घडले असले, तरी शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य करून तो अंमलात आणणे अशक्‍यप्राय आहे. याचे कारण, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने अजितदादा पवार यांच्यासोबत जे सरकार स्थापन केले, ते चार दिवसांत कोसळले आणि तेव्हापासून भाजपची विश्‍वासार्हता धुळीला मिळाली.

2014च्या विधानसभा निवडणुका सेना-भाजपने वेगवेगळ्या लढवल्या. त्यानंतर शिवसेना काही महिने विरोधी बाकांवर जाऊन बसली. मग शिवसेनेचे नेते मंत्रिमंडळात गेले. परंतु पुढच्या चार वर्षांत त्यांनी सतत फडणवीस सरकारवर टीकाच केली. आमच्या खिशात राजीनामे आहेत, असे सेनेचे मंत्री सांगत राहिले. पंढरपूरच्या सभेत तर तीस वर्षे युतीमध्ये सडत राहिलो, असे जहाल वक्‍तव्य उद्धवजींनी केले. एवढे करून परत त्यांनी भाजपसमवेतच निवडणुका लढवल्या. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या आश्‍वासनाचा भाजपने भंग केल्याचे सांगून, शिवसेनेने युती तोडली. त्यानंतर पक्षाचे धोरण संपूर्णपणे बदलून सेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमवेत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आता पुन्हा कोलांटीउडी घेऊन, त्यांनी भाजपशी दोस्ती केली तर जनता शिवसेनेला कधीच माफ करणार नाही.

या पार्श्‍वभूमीवर, हिंदुत्व हा शिवसेनेचा श्‍वास असून, सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत लाचार होणार नाही. त्याचबरोबर उगाच कोणाची पालखीही शिवसेना वाहणार नाही. स्वाभिमानाने आणि स्वतःच्या पायावर गंभीरपणे पुढची वाटचाल सेना करील, असे प्रतिपादन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 55व्या वर्धापनदिनानिमित्त केले आहे. याचा अर्थ, सत्तेकरिता शिवसेना वाट्टेल तशा तडजोडी करणार नाही. म्हणजेच पुन्हा मोदी-शहांपुढे लोटांगण घालणार नाही, असाही होतो. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या न्याय्य हक्‍कांसाठी सेनेचा जन्म झाला. स्वबळ म्हणजेच आत्मबळ आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर सेनेने आधी मराठी माणसाच्या हक्‍काची आणि नंतर हिंदुत्वाची लढाई लढली. आम्ही स्वाभिमानाने आणि स्वतःच्या पायावर भविष्यातील वाटचाल करू, ही भाषा प्रादेशिक अस्मितेचीच आहे.

मोदी सरकार संघराज्याची चौकट मानायलाच तयार नाही. दादागिरी करून प्रादेशिक पक्षांना चेपणे, हे मोदी सरकारचे ब्रीदवाक्‍य दिसते. नवीन पटनाईक, जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव यांसारखे नेते व मुख्यमंत्री केंद्र सरकारशी जमवून घेतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तर सत्तेसाठी वाट्टेल तशा तडजोडी केल्या असून, भाजपची गुलामीही पत्करली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला आडवे केले असून, केंद्राशी पंगा घेण्याची हिंमत दाखवली आहे. उद्धवजींनी मात्र दीदींइतकी आक्रमकता दाखवलेली नाही. त्यांनी मोदींशी उत्तम संबंध प्रस्थापित केले असून, शिवसेनेच्या मुखपत्रातून मात्र केंद्राविरुद्ध सातत्याने शरसंधान साधले जात असते; परंतु उद्धवजींनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यावर मात्र सातत्याने नाव घेऊन अथवा न घेता प्रहार चढवले आहेत. आताही सत्तेबाहेर राहावे लागल्याने या मंडळींना सारखा त्रास होतो.

करोनाकाळात सरकारने चांगले काम केल्याने, अनेकांच्या पोटात दुखत आहे. सत्तालोलुपतेतून विकृत राजकारण सुरू आहे. या मंडळींना राजकीय औषध मिळणारच आहे, असे शरसंधान त्यांनी सोडले आहे. रोजच्या रोज उद्धवजींवर पातळी सोडून चिखलफेक करणाऱ्या नारायण राणे यांचे नाव न घेता, उद्धवजींनी त्यांना, “प्रथम स्वतःला आरशात पाहा’, असा टोमणाही मारला आहे. यापुढे मुंबई महानगरपालिका व अन्य पालिकांच्या निवडणुका तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा संकल्प यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेश कॉंग्रेसचे पूर्वाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे बोलून दाखवला होता. परंतु आता मात्र कॉंग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्‍त केला आहे.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भाषा केली आहे. 2024 मध्ये “मीच मुख्यमंत्री होणार’, अशी बढाई पटोले यांनी मारली. नंतर तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही 2024 मध्ये कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री असेल, असा निर्धार व्यक्‍त केला. वास्तविक निवडणुका स्वबळावर लढण्याचा कोणताही निर्धार झाला नसल्याचे, कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी स्पष्ट केले असून, जो काही निर्णय व्हायचा तो दिल्लीतच होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते या संदर्भात काय म्हणतात, याला काडीइतकेही महत्त्व नाही.

उद्धवजींनीदेखील, आधी ताकद कमवा आणि मग स्वबळाच्या बाता मारा, अशा कानपिचक्‍या कॉंग्रेसला दिल्या आहेत. करोनाकाळात केवळ सत्ताप्राप्ती आणि निवडणुकीच्या राजकारणाचा खेळ होत राहिला, तर लोक जोड्याने मारतील, असे शरसंधान उद्धवजींनी केले असून, त्यामुळे कॉंग्रेसवाले यापुढे तरी गप्प बसतील, अशी आशा आहे. तसे न झाल्यास, महाविकास आघाडीची शिवसेना-राष्ट्रवादी ही दोन चाके एकीकडे आणि कॉंग्रेसचे चाक दुसऱ्या दिशेला, असे चित्र निर्माण होईल. याचा लाभ अर्थातच फडणवीस आणि त्यांचा कंपू घेतील, यात शंका नाही. जनतेला या प्रकारची अस्थिरता अजिबात नको आहे, एवढी तरी अक्‍कल महाविकासमधील घटकपक्षांना लवकरात लवकर आल्यास बरे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.