लेखनाद्वारे समाजामध्ये काही सुधारणा करता येईल, काहींना आधार देता येईल, काहींचे मार्गदर्शन करता येईल, अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून प्रकर्षाने लेखन करणारे दिनेश काळे आहेत, असे मला जाणवले. सन 2000 पासून त्यांचे कादंबरीविश्व साकार होऊ लागले. त्यांच्या कादंबऱ्यांची संख्या 2022 पर्यंत पंधरा इतकी झाली.
दिनेश काळे यांनी आपले मनोगत व आपली मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी कादंबरी लेखनप्रकाराव्यतिरिक्त अन्य लेखनप्रकारांचा आधार घेतल्याचा दिसून येते. कथासंग्रह, बालसाहित्य, एकांकिका, नाटक, कविता व अभ्यासपूर्ण लेखसंग्रह यांत समाविष्ट आहेत. मराठी भाषेबरोबर हिंदी आणि इंग्रजीमध्ये पारंगत असल्यामुळे त्यांनी आपले रचनाकौशल्य याही भाषेत दाखवले. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तत्कालीन सामाजिक समस्यांचे जवळून अवलोकन केले आहे. त्यामुळे त्यांचे लेखन अधिक आकर्षक, वाचनीय, परिणामकारक आणि प्रेरणादायक ठरले आहे.
टीका करणे, परीक्षण करणे हा साहित्यातील खऱ्याखुऱ्या संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. पंडित, विद्वान असूनही रुक्ष नसलेले, नव्या वस्तूंचे स्वागत करताना जुन्याचा वारसा न विसरणारे आणि भूतकाळाचा सुगंध घेताघेता भविष्याची स्वप्ने पाहणारे टीकाकार, समीक्षक, समालोचक, तत्त्वचिंतक असे सर्व प्रकारचे काम टीकाकार चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात. सहृदयी टीकाकाराला मानाचे महत्त्वपूर्ण स्थान मिळते. याच अनुषंगाने “दिनेश काळे यांचे कादंबरीविश्व : एक आकलन’ या पुस्तकात डॉ. प्रियदर्शनी वसंतराव देशमुख यांनी केलेले परीक्षण हे परीक्षणाचे व आकलनाचे एक प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण उदाहरण आहे.
एका पुस्तकाचे परीक्षण कोणत्या पद्धतीने केले पाहिजे, याची जाणीव आपल्याला करून दिली आहे. त्यांनी एकूण पंधरा कादंबऱ्यांचा कसून आणि विवेचनपूर्ण अभ्यास केल्याचे जाणवते. विवेचन वाचून संपूर्ण कादंबरीचे स्वरूप, उद्दिष्टे, कथावस्तू, पात्रचित्रण, वातावरण, भाषाशैली, संवाद व समकालीन मूल्ये अगदी सहजतेने समजून येत आहेत. प्रत्येक कादंबरीचे सार आपल्या लक्षात येते, एवढेच नव्हे तर, त्यांच्या आकलनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रत्येक कादंबरीच्या शीर्षकासोबतच एका अतिरिक्त वाक्याची जोड दिली आहे. त्यामुळे वाचकांची कादंबरीबद्दल जिज्ञासा आणि कादंबरी वाचनाची उत्सुकताही वाढते.
प्रत्येक कादंबरीमध्ये लेखकाने प्रयुक्त केलेल्या वाक्प्रचारांचा, म्हणींचा, वाक्यांची आशयघनता, बोलीभाषा, अंक दर्शन, इंग्रजी शब्द या सर्व विषयांचा ऊहापोह केलेला आहे. पदवी आणि पदव्युत्तर मराठी साहित्याचे विद्यार्थी तसेच पीएच. डी. करणाऱ्या भावी विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचे व मार्गदर्शनाचे एक साधनच त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग या पुस्तकाचे स्वागत करतील, यात मुळीच शंका नाही.
– डॉ. बीदन आबा, (माजी मराठी विभागप्रमुख, म. गांधी इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी ऑफ मॉरिशस)