कराचीत राजकीय लाथाळी प्रस्थापित सरकार कोलमडण्याची भीती
कराची, ता. 9 – पाकिस्तानचे पंतप्रधान महमद अली अमेरिकेला रवाना झाल्याने पाकची राजधानी कराचीमध्ये बऱ्याचशा अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. पाकिस्तान घटना समितीच्या काही प्रमुख व जबाबदार सभासदांनी काल, महमद अलींना, “आपले आसन स्थिर राखायचे असेल तर ताबडतोब कराचीला निघून या’ अशा आशयाची तातडीची तार पाठविली असल्याचे वृत्त कराचीतील काही वृत्तपत्रांनी आज प्रसिद्ध केले आहे. सत्तारूढ महमद अलींचे सरकार उलथून पाडण्यासाठी कराचीतील पंजाबी भाषिक गटाने बंगाल संयुक्त आघाडीशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे वृत्त आहे.
उपोषणाचा 50वा दिवस
कलकत्ता – बंगाल सरकारने गोहत्या-प्रतिबंधक कायदा करावा म्हणून उपोषणास बसलेल्या स्वामी रामचंद्र वीर यांच्या उपोषणाचा आजचा 50 वा दिवस! त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.
आसामात नाग जमातीच्या स्वतंत्र राज्याची स्थापना?
गौहत्ती, ता. 9 – सात लक्ष नाग वन्य जमातीच्या लोकांनी आसाम राज्यातील डोंगराळ मुलुखात “नाग प्रजासत्ताक राष्ट्रा’ची स्थापना केल्याची बातमी आली आहे. सुमारे 500 चौरस मैल मुलुख त्यांनी गिळला असून त्यांच्या ताब्यातील मुलुखाची सरहद्द ब्रह्मदेशाच्या सरहद्दीला भिडली आहे.
हॉंगकिंग नावाच्या नाग जमातीच्या पुढाऱ्याने आपल्या हातात सगळा राज्यकारभार घेतला असून आपल्याला मदत करण्यासाठी 15 मंत्री नेमले असल्याचेही म्हणतात. हॉंगकिंग या नाग जमातीच्या पुढाऱ्याचे परदेशांत शिक्षण झाले असून भारताच्या पूर्व सरहद्दीवरील कॅंटेज या गावी त्याने आपली राजधानी ठेवली आहे. हे गाव म्हणजे नाग लोकांचा बालेकिल्ला.
नाग वन्य जमाती राहतात त्या डोंगराळ मुलुखाचे एक वेगळे राज्य स्थापन करावे असे म्हणणाऱ्या नाग राष्ट्रीय समितीने हॉंगकिंग यांच्या सरकारला पाठिंबा दिला असल्याचे कळते. ज्यांनी त्यांना विरोध केला, त्यांची या नाग पुढाऱ्याने गर्दन कलम केल्याचे म्हणतात.