हॉटेल टॅक्सची आकारणी अन्याय्य आहे म्हणून रद्द करा
पुणे, ता. 28 – पुणे शहरातील हॉटेल व्यवसायावर “हॉटेल टॅक्स’ या नावाने व्यापारी कर वाढवून बसविण्यात आला आहे. सदर कराची आकारणी अन्याय्य स्वरूपाची आहे. सबब तो रद्द करावा अशी मागणी करणारा ठराव पुणे हॉटेल मालक संघाच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केला आहे. कॉर्पोरेशनमधील अधिकारारूढ पक्षाला या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याची या ठरावात विनंती करण्यात आली आहे. संघाची सार्वत्रिक सभा घेऊन त्यात हॉटेल टॅक्स रद्द करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करावा.
बगदादकरार संघटनेचे कायम प्रतिनिधी मंडळ स्थापन होणार
कराची – बगदाद करार संघटनेच्या प्रतिनिधींचे एक कायमचे मंडळ स्थापन करण्यात येईल. या परिषदेच्या अध्यक्षपदी बगदाद संघटनेचे सरचिटणीस हे राहतील असे बगदादकरार संघटनेच्या सचिवालय मंडळाने जाहीर केले आहे. संघटनेची लष्करी व्यवस्था बलिष्ठ करावयाची असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकात द्विपक्ष लष्करी करारांचा ओझरता उल्लेख होता. याबाबत वाटाघाटी चालू आहेत एवढेच या पत्रकात म्हटले आहे.
गिरणीकामगारांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याची मागणी फेटाळली
मुंबई – मुंबई औद्योगिक कोर्टाच्या फुलबेंचने मुंबईतील कापड गिरण्यांतील कामगारांच्या महागाई भत्त्यात कपात करावी ही गिरणी मालकांची मागणी फेटाळून लावली. औद्योगिक कोर्टाच्या फुलबेंचचे निकालपत्र 20 पृष्टांचे असून न्यायमूर्तींनी त्यात म्हटले आहे- कापड गिरण्यांनी अडचणींवर मात करून आपले अस्तित्व टिकविले आहे. सध्याच्या अडचणीवरही त्या मात करतील यात काही संदेह नाही. या अडचणी तात्पुरत्या आहेत. न्यायमूर्ती मेहर म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली आहे. ते आणखी वाढणारच आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढले की कापडाची मागणीही वाढेल. या दृष्टीने पाहता कापड धंद्याचे भवितव्य निराशाजनक आहे असे आम्हास वाटत नाही.
मागास राष्ट्रांच्या खऱ्या गरजेकडे दुर्लक्ष करू नका
राष्ट्रसंघ – मागास राष्ट्रे तांत्रिक प्रगती व्हावी म्हणून आक्रोश करीत आहेत तेव्हा राष्ट्रसंघाच्या खासनिधी यंत्रणेने शेती विकासावर फार भर देऊ नये, असे आवाहन भारताचे राष्ट्रसंघातील कायमचे प्रतिनिधी चंद्रशेखर झा यांनी केले. मागास राष्ट्रांनी मदतीची हाक देईपर्यंत थांबण्याची जरुरी नाही, असेही त्यांनी म्हटले.