कुटुंब नियोजनासाठी एक लाख रुपये अनुदान
नवी दिल्ली, ता. 20 – राज्य अनुदान समितीच्या शिफारशीनुसार कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था यांना एक लाख रुपये अनुदान मंजूर करण्याचा अधिकार भारत सरकारने राज्य सरकारांना दिला आहे. पूर्वी ही मर्यादा फक्त 50 हजार रुपयांपर्यंत होती.
भारताच्या हरित क्रांतीसाठी कॅनडा खते पुरविणार
ओटावा – कॅनेडियन आंतरराष्ट्रीय विकास खात्यातर्फे भारताच्या हरित क्रांतीसाठी 5 कोटी डॉलरचे कर्ज देण्याबाबत करार नुकताच करण्यात आला आहे. या कर्जातून भारताला पोटॅश व इतर खते यांचा पुरवठा करण्यात येईल. अशा तऱ्हेचा हा करार दुसरा आहे. यापूर्वी 1971 साली करार करण्यात आला होता. गव्हाच्या नव्या जातींचे उत्पादन करण्यासाठी भारताजवळ पोटॅश नाही व इतर जी देशी खते आहेत ती पुरेशी नाहीत म्हणून हा करार करण्यात आला आहे.
स्पेनने ब्रिटनशी संबंध तोडले जिब्राल्टरची पुन्हा डोकेदुखी!
माद्रिद – जिब्राल्टरच्या प्रश्नावर स्पेनने ब्रिटनशी असलेले आपले संबंध तोडून टाकले आहेत. तसे स्पेनने यूनोचे सरचिटणीस डॉ. कुर्ट वाल्ढाईम यांना कळविले आहे. सुमारे 8 वर्षांपूर्वी जिब्राल्टरच्या प्रश्नावर ब्रिटन व स्पेन यांनी आपसांत वाटाघाटी कराव्यात असे यूनो असेंब्लीने त्या दोन्ही राष्ट्रांस सुचविले होते. त्यानंतर लंडन व माद्रिद येथे या प्रश्नावर उभय राष्ट्रांच्या बैठका झाल्या पण तोड निघू शकली नाही. स्पेनचा विरोध असतानाही ब्रिटनने जिब्राल्टरमध्ये 1969 साली सार्वमत घेतले. त्यात जिब्राल्टरवासीयांनी ब्रिटिश अंमलाखालीच राहण्याचे प्रचंड बहुमताने मान्य केले.
चलन फुगवटा ही सर्व जगाची समस्या
नवी दिल्ली – चलन फुगवटा ही सर्व जगाची समस्या आहे पण या चलन फुगवट्याचा स्वार्थी उपयोग फक्त भारतातच केला जातो, असे मत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.