धरणाखाली जमिनी गेलेल्यांचे पुनर्वसन त्वरित करा – पवार
पुणे, ता. 9 – धरण प्रकल्पांसाठी ज्यांची जमीन संपादन करण्यात आली आहे अशा व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या कामाला अधिक गती देण्यात यावी, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या गृह, प्रसिद्धी आणि पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री शरदराव पवार ह्यांनी
आज येथे केले.
राज्यातील वीजकपात संपूर्ण रद्द झाली
मुंबई – महाराष्ट्रात गेल्या ऑक्टोबरमध्ये जारी केलेली 2 ते 25 टक्के वीज कपात सरकारने आजपासून रद्द केली आहे. कारण पाऊस फारच चांगला झाला आहे. वरील घोषणा वीजमंत्री तिडके यांनी पत्रकार परिषदेत केली. सध्या औष्णिक केंद्रे दुरुस्ती व साफसफाईसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. वीज कपातीच्या काळात ज्या राज्यांनी आपल्या राज्याला वीजपुरवठा केला त्यांचे मी आभार मानतो. तसेच वीज ग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो.
मोटारीवर राष्ट्रध्वज कोठे लावावेत
नवी दिल्ली – भारतीय ध्वज संहितेतील दुरुस्त उप कलमानुसार जेव्हा फक्त राष्ट्रध्वज मोटारीवर लावावयाचा असेल तेव्हा तो मोटारीच्या बॉनेटच्या मध्यभागी भक्कमपणे बसविलेल्या ध्वजदंडावर फडकवावा, असा आदेश भारत सरकारने दिला आहे. सध्याच्या तरतुदीत मोटारीच्या पुढील भागापैकी नक्की जागा दर्शविलेली नव्हती.
वॉटर गेटसारखी प्रकरणे शिक्षापात्र असावीत
यूनो कचेरी – यूनोचे सरचिटणीस कुर्ट वाल्डोन यांनी सर्व राष्ट्रांना अशी सूचना केली आहे की, वॉटर गेट प्रकरणासारखी प्रकरणे उत्पन्न होऊ नयेत म्हणून आपल्या देशांत खबरदारी घ्यावी. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संकेत रूढ करावेत. दुसऱ्यांची संभाषणे चोरून टेप करणे यासारखे गुन्हे शिक्षेस पात्र ठरावेत. दंड वा कैद किंवा दोन्ही शिक्षा ठोठवाव्यात.