भारी नोटा रद्द करण्याची योजना नाही
नवी दिल्ली – भारी नोटा रद्द करण्याची कल्पना अर्थखात्याचे राज्यमंत्री प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की, या मार्गाने काळा पैसा बाहेर येणार नाही. बेकायदेशीर मार्गाने जमा करण्यात आलेला पैसा स्थावर मालमत्तेत गुंतविण्यात येत आहे.
सरकार विविध करपद्धतीद्वारा सर्व पळवाटा बंद करून काळा पैसा निर्माण होणार नाही याची काळजी घेईल. काळ्या पैशाशी लढा देण्यासाठी सामाजिक जागृती निर्माण व्हावयास हवी. आयकर आकारणीच्या पद्धतीतही पावले उचलीत आहे.
देशाच्या आर्थिक विकासात सहा टक्के वाढ अपेक्षित
नवी दिल्ली – देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असून 75-76 सालामध्ये आर्थिक विकासात 5 ते 6 टक्के सुधारणा होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री सी. सुब्रह्मण्यम यांनी दोन्ही संसद सभागृहात सांगितले. गेल्या वर्षी ही वाढ दोन टक्के होती.
चालू आर्थिक वर्षात शेती व औद्योगिक वाढ गेल्या वर्षी 3 टक्के झाली ती चालू वर्षी 6 टक्के होईल, असा विश्वास असून खरीप व रब्बी हंगामातील उद्दिष्ट साध्य होईल. चलनवाढीस जरी आळा घालण्यात आला असला तरी चालू सालच्या अंदाजपत्रकातील तूटही वाढणार आहे.