स्थानबद्धतेची कारणे आता द्यावी लागणार नाहीत
नवी दिल्ली, दि. 31 – कोणालाही कारण सांगितल्याशिवाय जास्तीत जास्त एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे अधिकार सरकारला देणारी एक दुरुस्ती अंतर्गत सुरक्षा कायद्यात (मिसा मध्ये) करण्यात आली आहे. काल रात्री राष्ट्रपतींनी एक वटहुकूमाद्वारे ही दुरुस्ती केली. त्याआधी राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाशी चर्चा केली. जरी स्थानबद्धतेचे कारण सांगण्याची जरुरी नसली तरी आणीबाणीच्या काळात या इसमाला स्थानबद्ध करणे आवश्यक आहे, असे स्थानबद्ध करणाऱ्या अधिकाऱ्याला लिहून द्यावे लागेल व त्याची एक प्रत स्थानबद्ध केलेल्याला द्यावी लागेल. यापूर्वी मिसामध्ये अशी तरतूद होती की, जास्तीत जास्त 15 दिवसांत, स्थानबद्ध केलेल्याला स्थानबद्धतेची कारणे लेखी कळवावी लागत असत.
मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
नवी दिल्ली – “मिझो नॅशनल फ्रंट’चा राजकीय सल्लागार व “स्वयंभू ब्रिगेडियर’ दम खोसोइक हा त्याच्या 53 अनुयायांसह आज राज्यपाल सिंग यांना इंफाळ येथे शरण आला. या शरणागतांनी शस्त्रे व दारूगोळा यांचा मोठा साठाही स्वाधीन केला. या साठ्यातील बरीचशी सामग्री चीनमध्ये बनविलेली आहे.
इतर जीवनावश्यक वस्तूंचेही सार्वजनिक वाटप होणार
मुंबई – वनस्पती, खाद्यतेले, नियंत्रित कापड, केरोसिन, इंधन, धुलाईचे साबण आणि शाळांची क्रमिक पुस्तके यांचा समावेश सार्वजनिक वाटप व्यवस्थेत करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणावयाचे ठरले, तर या वस्तूंचे वाटप स्वस्त धान्य दुकानातून करण्यात येईल.