दीर्घ मुदतीचे उत्पादकता करार करावेत
नवी दिल्ली, दि. 10 – दीर्घ मुदतीचे “उत्पादकता करार’ करण्यासंबंधी उद्योगांनी विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले. उत्पादकता व बोनस यांची सांगड घातल्याने कार्यक्षमता वाढून कामगारांनाही त्याचे अधिक फळ मिळते.
उद्योगात “शॉप फ्लोअर प्लॅंट’ पातळीवर व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग योजनेस महत्त्व द्यावे. कामगार हा माणूसच असतो. तो मानवी दृष्टिकोनास प्रतिसाद देतो. आर्थिक प्रगती ही सामाजिक-आर्थिक न्यायाची निशाणी असली पाहिजे. म्हणून परस्पर विश्वासाच्या वातावरणात उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न व्हावयास हवेत.
मंगळावर जीवसृष्टी आहे की नाही?
वॉशिंग्टन – मंगळावर गेलेल्या अवकाशयानाकडून 5 महिने माहिती आल्यानंतरही अजून शास्त्रज्ञांना तेथे जीवसृष्टी आहे की नाही याबद्दल निश्चित असा निष्कर्ष काढता आलेला नाही.
“आनंद मठ’चा मराठी अनुवाद
पुणे – सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्रांच्या “आनंद मठ’ या कादंबरीचा मराठी अनुवाद श्रीपाद जोशी करणार आहेत. “वंदेमातरम’च्या शताब्दीनिमित्त त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मूळ कादंबरीतील गोडवा मराठी अनुवादात राखला जाईल. आनंद मठ वर यापूर्वी छोटी छोटी संक्षिप्त पुस्तके निघाली परंतु ही कादंबरी शब्दशः भाषांतर राहील.