-माधव विद्वांस
मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माते बाबुराव पेंढारकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 22 जून 1896 रोजी कोल्हापूर येथे झाला.
मास्टर विनायक हे त्यांचे सावत्रभाऊ व भालजी पेंढारकर हे धाकटे भाऊ. 1920 साली त्यांनी “सैरंध्री’ या मराठी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आणि चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. वर्ष 1920 ते 1966 या 46 वर्षांच्या कालखंडामध्ये 68 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून तर पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले तसेच दोन चित्रपटांची निर्मिती केली.
चित्रपट व्यवसायामध्ये सुरुवातीपासून चढउतार होतच होते. वर्ष 1933 मध्ये प्रभात फिल्म कंपनीचा कारभार पुणे येथे हलविण्याचे ठरविले. पण बाबुराव पेंढारकर यांना पुण्यात राहणे परवडणारे नव्हते म्हणून ते गेले नाहीत. ते प्रभातचे मॅनेजर होते, प्रभात हे नावही त्यांनीच सुचविले होते. मेजर निंबाळकर आणि भालजी यांनी “कोल्हापूर सिनेटोन कंपनी’ काढली व त्याचे मॅनेजर म्हणून बाबुरावांची नियुक्ती झाली.
कंपनीचा पहिला चित्रपट “विलासी ईश्वर’ प्रदर्शित झाला व त्यातही बाबुरावांनी भूमिका केली होती. पण सिनेटोनमध्ये त्यांची घुसमट होऊ लागली व त्यांनी कंपनी सोडायचे ठरविले. त्यांनी पांडुरंग नाईक यांच्या मदतीने हंस पिक्चर्स ही नवी कंपनी काढली. हंस पिक्चर्सचा त्यानंतर आलेला “ज्वाला’ चित्रपट न चालल्यामुळे संस्था डबघाईला आली.
नैराश्याने बाबुराव हे आचार्य अत्रे यांच्याबरोबर कोल्हापूरला गेले. आठवडाभरात नव्या चित्रपटाचा मुहूर्त न केल्यास संस्थेची पत राहणार नाही, असे ते अत्रे यांच्यापाशी बोलताच, अत्रे म्हणाले, आठ दिवसांऐवजी तीन दिवसांतच पटकथा लिहून देतो. आचार्य अत्र्यांच्या विनोदी शैलीतील “ब्रह्मचारी’ या चित्रपटाची कथा बाबुरावांच्या पुढे आली. हंस पिक्चर्समार्फत याचे प्रदर्शन झाले व या चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीला जीवदान मिळाले.
सर्वसाधारणपणे ठराविक साच्याच्या भूमिका करण्याचा अभिनेत्यांचा कल असतो. मात्र बाबुरावांनी अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या. अत्रेंच्या “महात्मा फुले’ मधील जोतिबांची त्यांनी केलेली भूमिका इतकी सुंदररीतीने त्यांनी वठविली की खुद्द अत्रेंना आपल्यासमोर साक्षात “जोतिबा’ असल्याचा भास झाला. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमातूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांच्यात असलेल्या लेखकाने बालगंधर्वाच्या मृत्यूनंतर “एकमेवाद्वितीय कलानिधी’ हा श्रद्धांजली लेख लिहिला.
आपल्या चित्रपट व्यवसायाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे “चित्र आणि चरित्र’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. आचार्य अत्रे यांनी या आत्मचरित्रावर अग्रलेखही लिहिला. वयाच्या पन्नाशीनंतर बाबुराव रंगभूमीकडे वळले. अत्रेंच्या सूचनेवरून त्यांनी “झुंझारराव’ साकारला व नाट्य अभिनेते म्हणूनही आपला ठसा उमटविला.
चित्रपट व्यवसायाचे धकाधकीचे जीवन जगत असताना त्यांची दैनंदिनी मात्र शिस्तबद्ध होती. रोजचा तासभर व्यायाम, देवावर श्रद्धा, जेवताना फळे नि दूध, साथीला आनंदी स्वभाव अशा पद्धतीने त्यांनी जीवन व्यतीत केले. 10 नोव्हेंबर 1967 रोजी बाबुरावांचे निधन झाले.