विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर बाजार निर्देशांक कोसळले

आखातातील तणावामुळे सावध गुंतवणूकदारांकडून विक्री

मुंबई – शेअरबाजार निर्देशांक अगोदरच अनेक अनिश्‍चित परिस्थितींचा सामना करीत असतानाच आखातामध्ये अमेरिका आणि इराण दरम्यानचा तनाव वाढल्यामुळे सोमवारी भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले. आता गुंतवणूकदार अधिक जोखीम घेण्याच्या मानसिकतेत नाहीत.

शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 407 अंकांनी म्हणजे 1.03 टक्‍क्‍यांनी कोसळून 39,194 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 107 अंकांनी कोसळून 11,724 अंकांवर बंद झाला. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 257 अंकांनी व निफ्टी 99 अंकांनी कमी झाले आहेत.

इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ले करण्याची धमकी दिल्यानंतर आशियाई शेअरबाजार आणि भारतीय शेअरबाजारावर त्याचा परिणाम झाला. या घटनाक्रमामुळे क्रूड तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. तसे झाल्यास भारतात इंधन महाग होऊ शकते असे वाटणाऱ्या गुंतवणूकदारांनी विक्री केली. त्याचबरोबर याच कारणामुळे चलनबाजारातही अस्थिरता निर्माण होऊन रुपया कमकुवत झाला.

आज झालेल्या विक्रीचा परिणाम वाहन, ऊर्जा, दूरसंचार, ग्राहक वस्तू, आरोग्य, तंत्रज्ञान, तेल आणि नैसर्गिक वायू आणि रिऍल्टी क्षेत्रावर होऊन या क्षेत्रांचे निर्देशांक 1.32 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले. तर धातू क्षेत्राचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले. मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप 0.30 टक्‍क्‍यांनी तर स्मॉलकॅप 0.14 टक्‍क्‍यांनी कमी झाले.

जागतिक बाजारात क्रूड तेलाचे भाव अर्धा टक्‍क्‍यांनी वाढले तर रुपयाचा भाव 11 पैशांनी कमी झाला. याबाबत बोलताना सॅक्‍टम मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुनील शर्मा यांनी सांगितले की आखातातील तणावाबरोबरच मान्सूनचा विलंब गुंतवणूकदारांना अस्वस्थ करीत आहे. या कारणामुळे निर्देशांक कमकुवत आहेत. त्याचबरोबर अर्थसंकल्प पंधरा दिवसात जाहीर होणार असल्यामुळे गुंतवणूकदार थांबा आणि वाट पाहा अशा मनस्थितीत आहेत. गुंतवणूकदारांचे मान्सुनच्या वाटचालीकडे लक्ष आहे. त्यामुळे आगामी आठवड्यात अस्थिर राहण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.