शालेय शिक्षण विभागामध्ये संचालकांची पदे रिक्त
कारभार अनेक महिन्यांपासून प्रभारींवर सुरू
पदोन्नतीने पाच अधिकाऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता
पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये संचालकांची पदे रिक्त आहेत. पदोन्नत्याद्वारे संचालक होण्यासाठी पाच अधिकारीच सध्या उपलब्ध आहेत. शासनाकडून त्यांची वर्णी कधी लावण्यात येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील हे सध्या पूर्णवेळ संचालक पदांवर नियुक्त आहेत. इतर कार्यालयांतील संचालकपदांचा कारभार अनेक महिन्यांपासून प्रभारींवर सुरू आहे. दिनकर पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे.
दत्तात्रय जगताप यांच्याकडे प्राथमिक शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व आयुक्त, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक अशा तीन पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे विद्या प्राधिकरणाच्या संचालक पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे.
शिक्षण विभागातील संचालक पदांच्या पदोन्नत्यांसाठी दिनकर टेमकर, तुकाराम सुपे, महेश पालकर, शरद गोसावी, कृष्णकांत पाटील हे पाच अधिकारी यादीत आहेत. यातील काही अधिकाऱ्यांची एका वर्षाने सेवानिवृत्ती होणार आहे. त्यापूर्वी तरी पदोन्नतीचा लाभ मिळावा अशी यांची साहजीकच अपेक्षा असणार आहे. दरम्यान, पुढील महिन्यात या अधिकाऱ्यांना पदोन्नत्या मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अतिरिक्त कार्यभारामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढतेय
अतिरिक्त कार्यभारामुळे संबंधीत अधिकाऱ्यांची डोकेदुखी प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच संबंधित कार्यालयातील विविध प्रकरणे मार्गी लावताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधीत कार्यालयांना पूर्णवेळ संचालक मिळणे गरजेचे आहेत. प्रकरणे मुदतीत मार्गी लागत नसल्याने अधिकाऱ्यांना शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विविध संघटना, लोकप्रतिनिधी यांच्या रोशाला सामोरेही जावे लागत आहे.