– ह.भ.प. आदिनाथ म. गुणारे
नातरी निदैवाचा परिवरीं । लोह्या रूतलियां आहाती सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ।। तैसा हृदयामध्ये मी रामु । असतां सर्व सुखाचा आरामु । कीं भ्रांतासि कामु । विषयावरी ।।
सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात भगवंत आहे, मात्र लोक ते जाणत नाहीत याचे उदाहरण देऊन माऊली म्हणतात, दुर्दैवी पुरूषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, पण तो तेथे राहून उपवास काढतो. त्याप्रमाणे या शरीररूपी घरात देव आहे; पण दैवहीन मनुष्याला तो दिसत नाही. राम सर्वांच्या हृदयात असताना लोक सुखाकरीता विषयांचीच इच्छा करतात.
तुकोबारायही लिहितात,
जनीं वनीं अवघा देव। वासनेचा पुसावा ठाव। मग वोळगा तो वासुदेव। ऐसा मनीं वसू द्या भाव गा ।।
सर्वांच्या ठिकाणी व्यापक असा एक देवच आहे. तो पाहण्याकरिता वासना ही समूळ नष्ट करावी व मग त्या वासुदेवाला शरण जावे. असा भाव तुम्ही आपल्या मनात बळकट करा.