61 वर्षांपूर्वी प्रभात : पुढील वर्षी भारतात रेल्वेची वीज-इंजिने

ता. 03, माहे मार्च, सन 1960

पुणे महापालिका सभासदांनी मानधन न घेता काम करावे

पुणे, ता. 2 – कॉर्पोरेशनच्या सभासदांनी मानधन न घेता केवळ वाहनभत्ता घ्यावा असे अंदाज पत्रकावरील सर्वसाधारण चर्चेत भाग घेताना गो. प्र. भागवत यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. कॉर्पोरेशनच्या तृतीय श्रेणीच्या सेवक वर्गाच्या मागण्या आणि त्यांनी संपासाठी केलेले अनुकूल मतदान याचा उल्लेख भागवत यांनी यावेळी केला.

पुढील वर्षी भारतात रेल्वेची वीज-इंजिने

नवी दिल्ली – चित्तरंजनच्या रेल्वे इंजिनाच्या कारखान्यात पुढील वर्षाच्या मध्याला रेल्वेचे पहिले विजेवर चालणारे इंजिन तयार होईल असे रेल्वे खात्याचे उपमंत्री शहान वाझ खान यांनी आज लोकसभेत सांगितले. दहा डीसी वीज इंजिने पुरवण्याबद्दल चित्तरंजन कारखान्याकडे मागणी करण्यात आली आहे. ही इंजिने पुढील वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत मिळतील.

चांगली भावंडे जशी वेगळी होतात तसेच विभाजनानंतर वेगळे होऊया

मुंबई – द्विभाषिक मुंबई राज्याच्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन आज दुपारी 2 वा. सुरू झाले. उभय सभागृहाच्या संयुक्‍त अधिवेशनापुढे केलेल्या भाषणात राज्यपाल श्रीप्रकाश यांनी द्विभाषिक विभाजन विधेयकावरील चर्चा सद्‌भावनेच्या, समजूतदारपणाच्या वातावरणात पार पडावी अशी अपेक्षा व्यक्‍त केली आणि दोन चांगली भावंडे जशी वेगळी होतात तसे आपण वेगळे होऊन चांगले शेजारी म्हणून राहावे असे आवाहन केले.

एव्हरेस्टच्या आरोहणार्थ पहिली भारतीय तुकडी

नवी दिल्ली – ब्रिगेडियर ग्यानसिंग यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठी पहिलीच पूर्ण भारतीय तुकडी जाणार आहे. ब्रिगेडियर ग्यानसिंग आज काठमांडूला रवाना झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.