दिनविशेष : वन्यजीवांसाठी वनसंपदा राखूया!

-विठ्ठल वळसेपाटील

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळी महत्त्वाची असते. या अन्नसाखळीत मानवाचे अस्तित्व नसले तरी कोणत्याही प्राण्याचे, वनस्पतीचे अडणार नाही; पण माणूस सोडून एखादा सूक्ष्म जीव किंवा प्राणी नसेल तर पूर्ण अन्नसाखळीच कोलमडून पडेल. अनेक प्राणी धोक्‍यात आहेत आणि मानव या गंभीर समस्येबद्दल सुस्तावलेलाच आहे. आज जागतिक वन्यजीव दिन आहे, त्यानिमित्त…

दिवसेंदिवस मानवी वस्तीवर वाघ, बिबट्या, लांडगे, कोल्हे यांचे हल्ले होत असल्याच्या बातम्या वाचण्यात येतात. हे वन्यजीव जंगल, अभयारण्य सोडून बाहेर मानवी वस्तीत का येतात, याची वनविभागाने शास्त्रीय चिकित्सा केली पाहिजे. जेव्हा वने समृद्ध होतील तेव्हा वन्यजीवांचे आश्रय स्थान निश्‍चित होईल. अन्यथा मानवी वस्ती हीसुद्धा त्यांची वस्ती होईल हे वास्तव आहे. भारत हा उष्ण कटीबंधीय प्रदेश असल्याने तीनही ऋतूंचे वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहे. जानेवारी अखेर उन्हाच्या झळा लागू लागल्याने जंगले व डोंगर, टेकडी माथ्यावरील वाढलेले गवत व इतर लहान झुडपे वाळून गेली आहेत. सध्या अनेक डोंगर रांगाना आगी लागत आहेत यात अनैसर्गिक व नैसर्गिकरीत्या वणवे लागून अनेक जंगले, त्यातील अनेक उपयुक्‍त वनस्पती, औषधी वनस्पती, पशू, पक्षी, कीटक, नष्ट होत चालले असून ते रोखण्यासाठी केवळ वनविभाग जबाबदारी पेलू शकत नाही. लोकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

वणव्याबाबत डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. डोंगर परिसरात दैवीशक्‍तीमुळे आग लागते. आग लागल्याने नवीन गवत चांगले वाढते. झाडांना पालवी फुटते. पुढील हंगामात तेंदूच्या पानांचा आकार वाढावा म्हणून गडचिरोलीसारख्या भागात कृत्रिम वणवे लावतात. जंगलात वावरणे व शिकार करणे सोपे जाते. अशा काही भाकड कारणांमुळे जंगलामधील नव्याने उगवण झालेली झाडे, झुडपे, पक्ष्यांची घरटे, अंडी, नवजात पिल्ले, सरपटणारे प्राणी जळून खाक होतात. त्यामुळे जैवविविधता नष्ट होत चालली आहे. याकडे दुर्लक्ष होत असून प्रबोधन हाच एकमेव पर्याय आहे. वन्यजीव मानवी वस्तीकडे का येऊ लागले, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. अनेक लोकांनी वन्यपशू, पक्षी संवर्धनाबाबत एकही पाऊल उचलले नसते. प्राण्यांवर प्रेम करायला कधी शिकणार, हा प्रश्‍न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे.

वन, जंगल, अभयारण्य तसेच माळरानाची समृद्धता वाढवणे, त्यांची संख्या वाढवणे हे दोन मूळ उद्देश ठेवून वन्यजीव संवर्धनाबाबत पाऊल उचलले पाहिजे. विकासाच्या नावाखाली जंगलांचे रूपांतर सिमेंटच्या जंगलात झाले. वाढत्या शहरीकरणामुळे जंगल नष्ट होत गेले अशा परिस्थितीत वन्यजीव राहणार तरी कुठे? ते मानवी वस्तीकडे अतिक्रमण करणार हे स्वाभाविक आहे. विकासाच्या नावाखाली वन्यजीवांच्या अधिवासावर कधी घाला घातला गेला हे लक्षातच आले नाही. अफाट जंगल तोड केल्यामुळे वने, जंगल, डोंगर, दऱ्या व रानातील जैवविविधता नष्ट झाली. त्यामुळे अन्नसाखळी तुटली. अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करत वन्यजीवांकडून शेतपीक, पशूधनावर हल्ले होतात. मानवाकडूनही वन्यजीवांचा जीव घेतला जातो, तर कधी वन्यजीव अन्नपाणी न मिळाल्याने जीव सोडतात. कधी मानवावरच हल्ले होतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे अहमदनगर, बीड व सोलापूरमध्ये 14 नोव्हेंबर 2020 पासून 9 जणांचा बळी गेला आहे. यात पाथर्डीतील तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. अखेर नरभक्षक बनलेला बिबट संपला पण या घटना सवयीच्या होऊन जाणार आहेत, हे लक्षात घ्यावे लागणार.

समृद्ध वने निर्माण करताना अन्न साखळी टिकवण्यासाठी तसेच जंगलातील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी नियमावली आवश्‍यक आहे. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते. त्यामुळे जंगल विकासात स्थानिक नागरिकांचा व स्वराज्य संस्थांचा सहभाग असावा. जंगलात विदेशी झाडे लागल्याने या झाडांना फुले, फळे, शेंगा नसल्याने वन्य जीवांचे अन्न नाहीसे झाले. वारंवार लागणाऱ्या वणव्याने अनेक औषधी व चारा वनस्पती जळून नष्ट झाल्या. मृत झालेले सरपटणारे प्राणी, रानससे, घोरपड, खोकड, माकड, रानडुक्‍कर, मुंगूस, खार, खवले मांजर, साळींदर, हरणाचे कळप असे जास्त उत्पत्ती होणारे प्राणी झटपट नाहीसे होतात. यावर प्राण्यांवर जगणारे वाघ, बिबट्या, लांडगा, तरस आणि कोल्हा इत्यादी प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येऊ लागतात. अन्नाच्या शोधात संचार करताना रस्ते, विहीर, कुंपण यातील अपघात, शिकार व उपासमारीमुळे अनेक प्राण्यांचे दरवर्षी मृत्यू होतात.

“टायगर नेट डॉट’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 2009 ते फेब्रुवारी 2018 या काळात 650 वाघांचा मृत्यू झाला आहे. 2018 सालात 102 वाघ, 57 हत्ती, 473 बिबट्या या प्राण्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 2020 मध्ये 172 बिबट्या मृत्युमुखी पडले. जंगल, डोंगरमाथ्यावरून जाणारे रस्ते, प्रकल्प अशा विकास योजनांमुळे 120 वनौषधी वनस्पती संकटात आहेत. जंगलावरील मानवी अतिक्रमणाचा विळखा घातकच ठरत आहे. हे चक्र नाहीसे करावयाचे असेल तर वन्यजीव व वनसंपदा संवर्धनासाठी लोकसहभाग हवाच.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.