पुणे नगरपालिकेच्या जन्माची कुळकथा
पुणें, ता. 1 – पुणे म्युनिसिपालटीची स्थापना 1856 साली झाली असा आतापर्यंत समज होता. परंतु आता मुंबई सरकारच्या दप्तरी असलेल्या कागदपत्रांवरून असे समजून आले आहे की, पुणें म्युनिसिपालटीची स्थापना 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर फक्त 10 दिवसांनी म्हणजेच 20 मे 1857 रोजी झालेली आहे.
पुणें म्युनिसिपालटीच्या स्थापनेचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. पुणें शहरांतील अंदाजे एक हजार रहिवाशांनी मुंबई सरकारकडे 1852 साली अर्ज करून पुणें शहरांत म्युनिसिपालटी स्थापन करण्याची विनंती केली. उलट म्युनिसिपालटी स्थापन झाली तर घरावर कर बसेल म्हणून काही नागरिकांनी या योजनेला त्यावेळी विरोधही केला होता.
1856 मध्ये सरकारने प्रथम म्युनिसिपालटी स्थापन करण्याबाबतचा जाहीरनामा सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध केला. तथापि, म्युनिसिपालटीची रितसर स्थापना 20 मे 1857 रोजी झाली.
कै. पांढरा कावळा
मद्रास – मद्रास येथील प्राणिसंग्रहालयामध्ये असलेला एकुलता एक पांढरा रंगाचा कावळा मरण पावल्याचे वृत्त आहे. याच सुमारास या प्राणिसंग्रहालयाची शंभरी साजरी होत असून या प्रसंगी मद्रासचे गव्हर्नर श्री. श्रीप्रकाश यांनी धवलकाक महाशयाचा मोठा आदरपूर्वक उल्लेख केला.
ते म्हणाले, “”तुरुंगातले हे जिणे बहुधा त्या स्वाभिमानी पक्ष्याला असह्य झाले असावे.” प्राणी संग्रहालयाचे चालक अशा स्वरूपाचा पांढरा कावळा शोधण्याच्या खटपटीस लागले आहेत. तिरुवनमलाई या ठिकाणी असा पक्षी सापडण्याचा संभव आहे.
तेनसिंगाच्या नावाने नेपाळांत नवा जिल्हा
कॉलिमपॉंग – ओखलघुंगा (पूर्व) जिल्हा न. 3 हे नाव बदलून त्याचे “सागर माथा तेनसिंग’ असे नाव ठेवण्याचे नेपाळ सरकारने ठरविले आहे. याच जिल्ह्याच्या भागात एव्हरेस्ट शिखर असून गौरीशंकर विजेता तेनसिंगची जन्मभूमीही तेथेच आहे. तेनसिंगाची स्वारी यशस्वी झाली तेव्हाच हे नामकरण करण्याचा नेपाळ सरकारने निर्णय घेतला होता.