समिती-पक्षनेता-वादासाठी लवाद नेमण्याचा निर्णय
पुणे, ता. 15 – पुणे महानगरपालिकेतील संयुक्त महाराष्ट्र समिती पक्षाचा नेता निवडण्याच्या प्रश्नावरून समिती पक्षात गेले काही दिवस चालू असलेला वाद सामोपचाराने मिटू न शकल्यामुळे अखेरीस हा प्रश्न लवादाकडे सोपवावा असा निर्णय समिती पक्षाच्या सभेत घेण्यात आला. पक्षनेत्याची निवड करण्यासाठी निवडलेल्या लवाद-मंडळावर एस. एम. जोशी, जयंतराव टिळक, ऍड. शंकरराव खरात, डॉ. वा. रा. ढमढेरे व बी. डी. किल्लेदार अशा पाच जणांची निवड करण्यात आली.
रशियाच्या मनात अमेरिकेबद्दल अनेक शंकांचे काहूर कशासाठी?
न्यूयॉर्क – अमेरिकन सरकारच्या शांतता-हेतूबद्दल रशियन संघराज्यांच्या मनात अनेक आशंका आहेत, असे सोव्हियत उपपंतप्रधान अनास्तास मिकोयान यांनी सुमारे 1100 लोकांपुढे भाषण करताना सांगितले. मिकोयान पुढे म्हणाले, तुमच्या देशाभोवती कोठेही आमचा एकही लष्करी तळ नाही; परंतु आमच्या देशाभोवती तुमचे अनेक लष्करी तळ आहेत.
ही कोणती संस्कृती?
प्रसिद्ध नटनटींचे नाचगाण्याचे कार्यक्रम अलीकडे “सांस्कृतिक’ कार्यक्रम म्हणून होत असतात. लोकांना त्या “सांस्कृतिक’ शब्दाचा कसलाही धाक वाटत नाही. लोकांना त्या कार्यक्रमाचा अर्थ बरोबर समजतो. ते संस्कृती शिकण्याच्या अपेक्षेने अशा कार्यक्रमास येत नाहीत आणि कोणीच त्या अपेक्षेने येत नाही. कारण तसे तेथे मुळातच काही नसते. संस्कृती या पाटीचा एक फायदा होतो. तो म्हणजे सभ्य, सुसंस्कृत म्हणविणारे व तसे मानले गेलेले लोक अशा कार्यक्रमास राजरोसपणे हजर राहू शकतात. चित्रपटगृहांत जाणे, इतरजनांसारखा सिनेमा पाहणे, नटींचे दर्शन घेत रमणे, हे ज्यांना कमीपणाचे वाटते ती माणसे “सांस्कृतिक’ कार्यक्रमास मात्र आवर्जून हजर राहू शकतात. पडद्यावर छायारूपाने वावरणारी मंडळीच सांस्कृतिक कार्यक्रमात प्रत्यक्ष जिवंत रूपात भाग घेतात. तेथेही चित्रपटांतील नटी पडद्यावर जशी असते तशीच प्रक्षोभक, उन्मादक वेषभूषा धारण करीत असतात. त्यांचे तेही दर्शन विलोभनीय असते म्हणून तेथेही लोक येतात. लोक सगळीकडे त्या दर्शनासाठीच धावपळ करतात. पुढारी मात्र फक्त “सांस्कृतिक’ कार्यक्रमाच्या वेळी येतात. याचा अर्थ त्या कार्यक्रमात पुढारी मंडळीच उपरी असतात. तेथे लोकांनाच खरे स्थान आहे.