जीवनगाणे : स्माईल प्लिज…

-अरुण गोखले

फोटो काढण्यापूर्वी प्रत्येक फोटोग्राफर समोरच्या व्यक्‍तीला सूचना देत असतो की… स्माईल प्लिज… कारण कोणतेही प्रसन्न हास्य हे पाहणाऱ्याला सुखावत असते.

याबाबतीत मला आमच्या एका आत्याची शिकवण नेहमी आठवते. ती सांगायची, सकाळी सकाळी उठल्यावर माणसाचा चेहरा कसा असायला हवा? तर फांदीवर उमलणाऱ्या, फुलणाऱ्या हसऱ्या फुलासारखा. कारण चेहऱ्यावरचे हास्य मानवी मनोवस्थेचे दर्शक असते. आपल्या साध्या हसण्याने जर आपण इतरांना सुखावणार असलो तर इतरांची मनं जिंकण्याचे साध सोपं माध्यम वापरायला काय हरकत आहे? माणसाचा चेहरा हा अंतर्मनाचा आरसा असतो, हेच खरं, नाही का?

दुर्मुखलेल्या चेहऱ्याची, रडवेली, उदास चेहऱ्याची माणसं पाहायला नकोशी वाटतात. पण तोच जर एखादा सुहास्य सुंदर असा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आला तर तो आपल्याही गालावर नकळत एक सुखाची समाधानाची हास्यरेषा फुलवून जातो. हसण्याला आणि हसवण्याला जीवनात फार महत्त्व आहे. समोरच्या व्यक्‍तीला तुम्ही शब्दांनी किंवा कृतींनी चटकन दुखावता, रडवता. पण दुसऱ्याला हसायला लावण्या इतक दुसरं अवघड काम नाही. ज्यांना हसण्याचं मोल कळतं ना! ती माणसं दुसऱ्यांना हसवण्यासाठी जीवाचे रान करतात. चार्ली चॅपलिन सारख्या व्यक्‍तिरेखा तर स्वत:च्या वैयक्‍तिक जीवनातली डोळ्यातली आसंवंही लपवून जगाला मात्र हसविण्यात समाधान मानत जगलेली असतात.

गालावरचं हास्य हे दोन जीवांना जोडणारे, बाळाचे निरागस हास्य पाहणाऱ्याचे त्याच्याशी अतूट नाते जोडणारे, निराशेतून आशेचा अंकुर फुलविणारे असते. हसण्याची क्रिया ही मन आणि शरीर ह्यांच्याशी इतकी निगडीत असते की, परस्परांच्या प्रतिसादाशिवाय चेहऱ्यावर फुलत नाही. खरंतर सुखी जीवनाचं हास्य हे एक गमक आहे. हास्य माणसाच्या तना- मनावरचा ताण दूर करते.

हा असा मनावरचा व शरीरावरचा ताण दूर व्हावा म्हणूनच सध्या बागांमधून हास्यग्रुपची निर्मिती झालेली आहे. तना- मनाचे आरोग्य राखणारे हास्य हे कसे असावे याचेही प्रकार, पद्धती ठरलेल्या आहेत.

हास्याची कारंजी फुलवण्यासाठी हास्यकथा, कविता, विनोद, विनोदी चित्रपट या आणि यांसारख्या माध्यमांचाही वापर केला जातो. हास्य हा सध्याच्या काळातला मानवी मनावरचा ताण दूर करणारा एक प्रभावी उपाय ठरतो आहे. हसण्याच्या संदर्भात एक गोष्ट मात्र कटाक्षाने लक्षात ठेवायची की, जीवनात आपलं हसं होणार नाही याकडे जागरुकतेने लक्ष द्या आणि उगाच उपहासाने इतरांनाही तुम्ही निष्कारण हसू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)