लक्षवेधी : विजयात विनम्रता; पराभवात मंथन!

-राहुल गोखले

“प्रचंड’ या एकाच शब्दाने ज्याचे वर्णन करावे लागेल असा विजय मिळवून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सर्व माध्यमे, विचारवंत, अभ्यासक यांचे भाजपला स्वबळावर बहुमतापासून वंचित राहावे लागेल, हे अंदाज सपशेल खोटे ठरविले आहेत. विरोधकांच्या आव्हानासमोर भाजप डळमळीत झाला आहे आणि त्यामुळे भाजप मित्रपक्षांना चुचकारतो आहे हे सगळ्यांचे निरीक्षण भाजपच्या अभूतपूर्व विजयाने चुकीचे ठरविले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, चलनबदल, जीएसटी हे मुद्दे उपस्थित करून विरोधकांनी भाजपला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले आहे, या विश्‍लेषणावर या विजयाने पाणी फेरले.

“अबकी बार तीनसो पार’ ही घोषणा भाजपचे नेते देत होते हे खरे; परंतु ती सामान्यतः कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी होती हेही तितकेच खरे. मात्र, ती घोषणा प्रत्यक्षात उतरेल असा विश्‍वास किती भाजप नेत्यांना होता हे सांगता येणार नाही. शत्रुघ्न सिन्हांपासून चंद्राबाबू नायडूंपर्यंत अनेकांनी भाजपची साथ सोडली तेव्हा भाजप जिंकून येण्याच्या स्थितीत नसल्यामुळे हे होत आहे, असे जे सांगण्यात येत होते ते तार्किक या विजयाने उद्‌ध्वस्त केले आहे. एकूण या सुप्त लाटेचा अंदाज कोणालाच आलेला नव्हता आणि त्यामुळेच भाजपचा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हा दणदणीत विजय एकीकडे अनपेक्षित आणि दुसरीकडे अनाकलनीय आहे.

विखारी आणि पातळी घसरलेल्या प्रचाराचा धुरळा, मतदानाच्या फेऱ्या आणि मतमोजणी हे सगळे टप्पे संपून आता निकालही लागले आहेत आणि आता विजयाचे आणि पराभवाचे विश्‍लेषण सुरू होईल. भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा कशा मिळवू शकला आणि दुसरीकडे कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल यांचा धुव्वा का उडाला यावर चर्वितचर्वण होईल. हे समाज माध्यमांवर होईल, माध्यमांतून होईल. प्रश्‍न हा आहे की ते त्या त्या पक्षांमध्ये होईल का? तेथे ते व्हायला हवे. कॉंग्रेसला ज्या तीन राज्यांत गेल्या डिसेंबरमध्येच विधानसभा निवडणुकांत सत्ता मिळाली होती त्या राज्यांत ते वातावरण पाच महिनेही कॉंग्रेस का टिकवून ठेवू शकली नाही यावर पक्षांतर्गत चर्चा व्हावयास हवी. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आततायीपणा करून अमित शहा यांना प्रचारासाठी राज्यात येण्यास अडथळे निर्माण केले आणि राज्यात हिंसाचार होऊनही भाजपला तृणमूलच्या बालेकिल्ल्याला खिंडार कसे पाडता आले यावर तृणमूलने गांभीर्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे. देशभर तिसरी आघाडी बनविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना आपल्याच राज्यात आपला धुव्वा उडताना का पाहावे लागले आणि रालोआतून बाहेर पडून नक्‍की आपण काय साध्य केले यावर तेलगू देसम पक्षाने चिंतन केले पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात कॉंग्रेसशी आघाडी करूनही खुद्द पार्थ पवारांची जागाही त्या पक्षाला का मिळविता आली नाही याचे मंथन राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले पाहिजे. मोदींवर प्रखर टीका करून आणि सौम्य हिंदुत्वाची कास धरूनही राहुल गांधी यांची जादू का चालली नाही आणि अमेठीसारख्या परंपरागत मतदारसंघात खुद्द राहुल यांना पराभवाचा सामना का करावा लागला याचे विश्‍लेषण कॉंग्रेस नेतृत्वाने करावयास हवे. एकूण विरोधकांची दाणादाण का उडाली याचे विश्‍लेषण हे पक्षाबाहेरपेक्षाही त्या त्या पक्षांच्या व्यासपीठांवर झाले आणि त्या मंथनातून निघालेल्या निष्कर्षांवर कृती झाली तरच विरोधकांचे हे दयनीय चित्र बदलू शकते. पराभवाने न खचणे आणि मुख्य म्हणजे नेत्यांपेक्षा संघटनेवर, कार्यक्रमावर, धोरणांवर भर देणे हा मार्ग विरोधकांना अवलंबावा लागेल. एरवी केवळ भाजपविषयी नाराजी जनतेत कधीतरी वाढेल आणि मग त्याचा आपल्याला फायदा उठविता येईल या अल्पसंतुष्टतेत व आत्मसंतुष्टपणात भाजप विरोधक मग्न राहिले तर त्यांच्या ललाटी हेच विधिलिखित पुन्हा पुन्हा लिहिले जाईल.

पराभवाचे विश्‍लेषण असते तद्वतच विजयाचे देखील विश्‍लेषण करणे गरजेचे असते. आपण दिलेली आश्‍वासने किती पूर्ण करू शकलो या वास्तविकतेची जाणीव भाजपला देखील आहे. असे असतानासुद्धा मतदारांनी आपल्या पक्षाला भरभरून मतदान का केले याचे चिंतन भाजप नेतृत्वाने केले पाहिजे. कारण अनेकदा विजयाचे रूपांतर जबाबदारी ओळखण्यात न होता उन्मादात होत असते. बंगालपासून आंध्रापर्यंत आणि मध्य प्रदेशपासून बिहारपर्यंत विरोधकांची खिल्ली उडवित प्रचारात भाजपने धुरळा उडवून दिला होता आणि कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगालमधील भाजप-विरोधी पक्षांची सरकारे लोकसभा निवडणुकीनंतर अस्थिर होतील असे संकेत दिले होते. एकीकडे लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे अशा अस्थैर्याची भाषा करायची हे योग्य नव्हे. विजय हाही दिमाखात स्वीकारता आला पाहिजे; अशा घोषणा आणि कथित धमक्‍यांनी त्या दिमाखाला गालबोट लागता कामा नये. भाजपला मतदान करून मतदारांनी अपेक्षांचे मोठे ओझे भाजप नेत्यांच्या खांद्यावर टाकले आहे. ही संधीही आहे आणि आव्हानही. गेल्या पाच वर्षांत भाजपने काही राज्यांत सत्ता मिळविण्यासाठी विधिनिषेधशून्य कारवाया केल्या, मग ते कर्नाटक असो; गोवा असो; की उत्तराखंड असो. त्या कृतींकडे मतदारांनी बहुधा कानाडोळा केला असेलही आणि तेही बहुधा व्यापक चित्राकडे पाहून. बहुधा मोदींच्या नेतृत्वात आश्‍वासकता दिसली असेल. कारण काहीही असो; मतदारांनी भाजपवर दांडगा विश्‍वास दाखविला आहे. आता गेल्या वेळेप्रमाणे कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपद तांत्रिक कारणांवरून नाकारणे, लोकपाल वेळी न नेमणे, अशा गोष्टी भाजपने टाळल्या पाहिजेत. विजय तरच शोभून दिसतो जर त्यात दिलदारपणा असेल तर. कॉंग्रेसमुक्‍त भारतासारखी भाषा योग्य नाही आणि विरोधक प्रबळ नसले तर सरकारवर वचक राहत नाही याची जाणीव ठेवून भाजपने विरोधकांचा आदर राखला पाहिजे. भाजपला दुसरा कार्यकाळ मिळाला आहे आणि मोदींना देखील मुक्‍तहस्ते काम करता येईल असे संख्याबळ प्राप्त झाले आहे. परंतु या झगमगाटात अनेकदा उणिवा झाकोळून जातात. विजयाचे विश्‍लेषण गरजेचे असते ते त्यामुळेच. विजयाच्या क्षणी केवळ तो साजरा करणे हे क्रमप्राप्त असले आणि त्याविषयी कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नसले तरी जरा स्थिरस्थावर झाल्यावर विजयाचे, यशाचे देखील विश्‍लेषण करणे आवश्‍यक ठरते.

विजय आणि पराभव हे निवडणुकीचे अविभाज्य घटक आहेत आणि विजयाने हुरळून किंवा पराभवाने खचून जाण्याचे कारण नसते. त्यापेक्षा विश्‍लेषण, आत्मपरीक्षण, चिंतन हे अधिक गरजेचे. यश अंतिम नसते आणि अपयश निर्णायकरित्या घातक नसते, असे चर्चिलने म्हटले होते. हे सार्वकालिक सत्य आहे. तेव्हा भाजप, कॉंग्रेस, अन्य पक्ष या सगळ्यांनीच यापासून धडा आणि बोध घ्यावयास हवा. विजयात विनम्रता आणि पराभवात मंथन हे धोरण ठेवले तर राजकीय पक्ष अधिक परिपक्‍व होतील आणि त्या ओघात लोकशाही देखील सशक्‍त होईल. पक्ष, यशापयश, विजय-पराजय यापेक्षा लोकशाही अधिक स्थायी आहे हे अधोरेखित करावयास हवे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.