संडे स्पेशल : कृष्णामाईच्या तीरावर…

-अशोक सुतार

प्रिय प्रतिभा,

तू माझ्या ठायी ठायी विसावली आहेस. शांत रात्री फिरताना चंद्राचा दरबार भरतो, त्यावेळी चांदणी बनून तू माझ्यासवे भ्रमण करत असतेस. अंधाररात्री कृष्णामाईच्या तीरावर हलकेच तुझी पावले वाजू लागतात.

पायातील चांदण्यांची पैजणे छुनछुन वाजू लागतात. आसमंतात बांबूच्या बेटातून बासरीचे सूर घुमत असतात. झाडांचीही लगबग सुरू होते. कृष्णेचे पाणी थरारते, आसुसते ते चंद्राचे दर्शन घ्यायला. सर्व सृष्टी सज्ज झाली आहे, चंद्राचे स्वागत करायला. झाडांवरील पक्षी निस्तब्ध झालेत. त्यांनाही उत्सुकता आहे. चांदण्यांचा रथ घेऊन चंद्रसेनाचे आगमन झाले.

सृष्टीत नवा जल्लोष. चांदण्याही बावरल्या आहेत, काही लाजून चूर झाल्या. त्यांच्या गालावर उषेची लाली फुटली आहे. चांदण्यांची लगबग सुरू असताना श्‍यामल मेघांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. वातावरण आणखी अंधुक होत असताना मेघ वेगाने त्या क्षितिजापलीकडे गेले. त्यांनाही सृष्टीचा हा सोहळा पाहायचा असेल कदाचित! चंद्राने सृष्टीवर आपली मोहिनी टाकली असून झाडे, कृष्णेचे पाणी आणि तीरावरील मंदिरेही चंद्रप्रकाशात न्हाऊ लागली.

चांदण्या राती पायात पैजण घालून चंद्रसखीने नृत्य सुरू केले आहे. तिच्या सख्या तिच्याभोवती फेर धरून नाचत आहेत. श्रावणातील मंगळागौरीची गाणी गाताना माहेरवासिनी जशा उत्स्फूर्तपणे, बेभानपणे लय, ताल आणि तोल सांभाळून नृत्य करतात, तोच आनंद चंद्रसखी आणि तिच्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. गोकुळात यमुना नदीच्या तीरावार कृष्ण आणि गोपिका तल्लीन होऊन रासक्रीडेत मग्न आहेत, असे दृष्य कृष्णामाईच्या तीरावर दिसत आहे. कृष्णामाई वरून संथ वाहत असली तरी प्रवाहात चैतन्य भरलेले आहे. वाऱ्याचीही लगबग सुरू आहे. सृष्टीला शीतलता मिळावी म्हणून तो कसोसीने प्रयत्न करत आहे.

सर्वत्र गार हवेची झुळूक मनाला मोहवीत आहे. मन प्रसन्न झाले आहे आणि प्रतिभाही समोर अवतीर्ण झाली आहे. प्रतिभेचे असेच असते, जेव्हा तिची आराधना करतो तेव्हा ती काही केल्या समोर येत नाही. शब्द फुटत नाहीत, शब्दाला साधे कोंबही फुटत नाहीत आणि कसलाही विचार सुचत नसेल तर सृष्टीला शरण जावे.

तिच्याकडे हळुवार, सौंदर्यदृष्टीने पाहावे. हृदयातील प्रतिभेचे झरे फुटतील. त्या झऱ्याभोवती पक्षी किलबिलाट करत असतील, ते एक नव्या नवलाईचे गीत असेल. झऱ्यातील पाण्याच्या लयबद्ध प्रवाहामुळे संगीत झंकारेल. संगीत आणि गीत यांची झऱ्यावरील मैफील रंगेल. या रंगणाऱ्या मैफलीत नवे जीवनप्रवाह सुरू होतील. त्यातून पुन्हा निर्मिती होईल प्रतिभेची. काव्य म्हणतात ते हेच असावे का?

दूर आसमंतात कोण हृदयातून आर्त हाक मारत आहे. नव्या जीवनाचे कोण गीत गात आहे! चंद्र आणि चांदण्या आकाशात विहार करून थकल्या आहेत. आता ब्रह्ममुहूर्तावर सृष्टी नव्याने कात टाकत आहे. पूर्वेला आकाशाच्या एका कोपऱ्यात जांभळ्या-गुलाबी छटा उमटू लागल्या आहेत.

शीतल वारा, मंद चांदण्या आणि कुंद कळ्यांचा धुंद सुगंध, कृष्णेच्या पात्रातील खळखळता प्रवाह सृष्टीला चैतन्याने भारून टाकत आहे. उत्तरेचा ध्रुव तारा अजून ठाण मांडून आहे. ध्रुवबाळ, त्याने ईश्‍वराला वरदान मागितले होते की, मला अशी जागा दे, जिथून मला कोणीही खाली खेचू शकणार नाही. मानवापासून मानवाने दूर जाण्याचा वर मागण्याएवढी परिस्थिती पुन्हा कधी निर्माण होऊ नये.

मानवाला मानवाचीच भीती वाटावी, त्याच्यापासून असुरक्षित वाटावे, असे होणे म्हणजे मानवतेची खूण पुसल्यासारखी आहे. मानवता ही आयुष्याचा पाया असेल तर जगणे समृद्ध होईल. उत्तररात्र संपून पहाटवारा वाहू लागला आहे. ब्रह्ममुहूर्त आता लवकर संपेलही. भल्या पहाटे फिरायला जावे, अनवाणी चालण्याची मजा काही औरच! पहाटे फिरण्यामुळे शुद्ध हवा मिळते, असे म्हणतात.

मी आजोबांना याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, ब्रह्ममुहूर्तावर जगातील सर्व योगी, साधू समाधी अवस्थेत ईश्‍वराचे चिंतन करतात. त्यामुळे हवा शुद्ध आणि पवित्र असते. असो, अंधारयात्रा संपून गुलाबी, केशरी रंगांची उधळण आकाशात होऊ लागली आहे. आम्ही आज नव्या जीवनाचा प्रवास करण्यास सज्ज झालो आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.