प्रेरणा : दुष्काळाशी असाही मुकाबला

-दत्तात्रय आंबुलकर

यावर्षी “पद्मश्री’ पुरस्कार बीड जिल्ह्यातील दहिवंडी गावच्या शब्बीर सय्यद यांना राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शब्बीर सय्यद यांचे दहिवंडी हे गाव तसे बीड जिल्ह्याच्या दुष्काळी परिसरातील. दुष्काळ या गावाच्या पाचवीला पुजलेला. मात्र, अशा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवरसुद्धा शब्बीर सय्यद यांची गो-सेवा व गायींबद्दलचे प्रेम कायम असून त्यांच्या याच कार्यासाठी शब्बीर सय्यद यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

आपल्या गाय-प्रेमाबद्दल शब्बीरभाई आवर्जून नमूद करतात की, मला माझ्या गायींबद्दल मोठी आस्था असून त्यांच्या सान्निध्यात आनंद व समाधान मिळते. कठीण परिस्थिती व दुष्काळी पार्श्‍वभूमीवर ते आपल्या गायींसाठी चारा-निवारा या दोन्हींचा बंदोबस्त करतात.

शब्बीरभाईंच्या या सातत्यपूर्ण गोसेवेच्या प्रयत्नात आता त्यांना जनसामान्यांसह स्वयंसेवी संस्थांचेही उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे. यासंदर्भात विशेष उल्लेखनीय सहकार्य करणाऱ्या निरंजन सेवाभावी संस्था या स्वयंसेवी संस्थेचा उल्लेख करावा लागेल. ही संस्था हे काम गेली 10 वर्षे सातत्याने करीत असून त्यासाठी पुण्यातील नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. आज शब्बीरभाईंच्या गायींच्या कळपात त्यांच्या वैयक्‍तिक प्रयत्नातून सुमारे 125 गायींचा समावेश आहे. त्यांचे असे मत आहे की, तुम्ही जर प्रामाणिकपणे, निःस्वार्थपणे व सातत्याने काम केले तर तुम्हाला मुक्‍या जनावरांचा आशीर्वाद, गो-सेवेचे समाधान व जनतेसह सामाजिक संस्थांचे सहकार्य निश्‍चितपणे मिळते.

अर्थात गोसेवेच्या या प्रयत्नांमध्ये शब्बीरभाईंना विविध आव्हानांचा सामना करावा लागला. मराठवाड्यात व त्यातही बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागात दरवर्षी सुमारे 4 ते 5 महिने पाणी आणि चाऱ्याची टंचाई भासते व हा काळ अर्थातच पाणीटंचाई व दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर गोपालन-गोसेवा करणे हे मोठे आवाहनपर काम ठरते. मात्र, या आव्हानांवर शब्बीरभाई वर्षानुवर्षे मात करीत आहेत.

आपल्या प्रयत्नांना वाढते यश मिळून आता राष्ट्रीय स्तरावर व सरकार दरबारी पद्म पुरस्काराची जोड व पोचपावती मिळाल्याबद्दल शब्बीरभाई समाधानी आहेत. त्यांच्यामते पद्मश्री पुरस्कारामुळे त्यांच्या प्रयत्नांचे चीज झाले असून त्यांना त्यामुळे वाढीव प्रेरणा-प्रोत्साहन मिळाले आहे.

पुरस्कारामुळे शब्बीरभाईंच्या प्रयत्नांना आता सरकारी पाठबळही मिळू लागले असून त्याचा अनुभव नव्याने येऊ लागला आहे. मात्र, शब्बीर सय्यद आपल्या गोपालन गो-सेवेच्या प्रयत्नात आपल्या परिवारासह सहभागी होत आहेत. याकामी शब्बीरभाईंचा मोठा मुलगा युसूफ आपल्या वडिलांच्या गोपालन प्रकल्पात सहभागी झाला असून पिता-पुत्रांच्या या गोपालन प्रयत्नांना नजीकच्या भविष्यात मोठे यश मिळेल, याबद्दल दोघेही खात्री देत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.