मंथन : नव्या संधींचे अवकाश

-के. सिवन, अध्यक्ष, इस्रो

अंतरिक्षविषयक घडामोडींमध्ये खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अंतरिक्ष संवर्धन आणि प्रमाणीकरण केंद्राच्या म्हणजे इन-स्पेसच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही ऐतिहासिक सुधारणा असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे तर इस्रोने ही संधी असल्याचे म्हटले आहे. अंतरिक्ष कार्यक्रमांत खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावरून अनेक प्रश्‍नही उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) प्रमुख के. सिवन यांनी व्यक्‍त केलेले मनोगत.

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे देशात अंतरिक्ष आधारित ऍप्लिकेशन्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अंतरिक्षावर आधारित अनेक नवनवीन उत्पादने तयार होत आहेत आणि त्यांच्या मागणीचा जणूकाही स्फोटच झाला आहे. ही मोठी मागणी पूर्ण करणे एकट्या इस्रोला (भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था) शक्‍य नाही. दुसरीकडे, खासगी उद्योग अंतरिक्ष कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या दृष्टीने आता तयार झाला आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, जागतिक अंतरिक्ष व्यवसाय 360 अब्ज डॉलर्सचा आहे; परंतु त्यातील भारताचा वाटा अवघा तीन टक्‍क्‍यांचा आहे. जागतिक अंतरिक्ष बाजारपेठेत आपली भागीदारी आणखी वाढविण्यासाठी खासगी क्षेत्राचा उपयोग होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु खासगी क्षेत्राला अंतरिक्ष क्षेत्रात उतरण्याची संधी देण्याचा विषय जेव्हा

चर्चेला येतो, तेव्हा त्यासाठीची कोणतीही यंत्रणा तयार नाही, हे वास्तव समोर येते. त्यासाठीच राष्ट्रीय अंतरिक्ष संवर्धन आणि प्रमाणीकरण केंद्र स्थापनेच्या म्हणजे इन-स्पेसच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अंतरिक्ष कार्यक्रमात खासगी क्षेत्राची भूमिका निश्‍चित असणे आवश्‍यक आहे. खासगी क्षेत्र आता अंतरिक्ष कार्यक्रमात रॉकेटची निर्मिती, उपग्रहांची निर्मिती, त्यांचे प्रक्षेपण, अंतरिक्ष आधारित ऍप्लिकेशन्स तयार करणे आणि त्यासंबंधीच्या सेवा प्रदान करणे अशी कामे हाती घेऊ शकेल. त्यासाठी उद्योगांना अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महागड्या सुविधांची गरज असेल. या सुविधा इस्रो प्रदान करेल.

इन-स्पेसमुळे इस्रोच्या सुविधांचा उपयोग करण्याचा खासगी क्षेत्राचा मार्ग प्रशस्त होईल. उद्योगांचे काम यामुळे सोपे होईल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास अंतरिक्ष विभागाचे इस्रो, इन-स्पेस आणि एन-सिल या तीन विभागांत विभाजन झाले आहे, असे म्हणता येईल. अर्थात, अंतरिक्ष विभागाचे सध्याचे स्वरूप त्यामुळे बदलणार नाही. इन-स्पेस ही एका अतिरिक्‍त संघटनेच्या स्वरूपात कार्यरत होईल. त्यामुळे इस्रोची संरचना किंवा सध्याची व्यवस्था यात काहीच बदल होणार नाही.

उपग्रहांचे नियमित प्रक्षेपण करण्याची जबाबदारी कुणाची असेल, असा एक प्रश्‍न यातून निर्माण होऊ शकतो. परंतु त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. शास्त्रीय मोहिमा, क्षमता विकसित करण्याशी संबंधित मोहिमा, अत्याधुनिक तंत्रज्ञानासंबंधीचे कार्यक्रम सुरू करण्याची जबाबदारी आताही इस्रोकडेच असेल. व्यावसायिक मोहिमांचा विचार केल्यास त्याची जबाबदारी एन-सिलकडे (न्यू स्पेस इंडिया लिमिटेड) असेल. त्यासाठी एन-सिल वापरकर्त्यांशी संपर्क साधेल आणि त्यांच्या मागण्यांशी अनुरूप इस्रो किंवा खासगी उद्योगांना उपग्रह किंवा प्रक्षेपण यान (रॉकेट) तयार करण्यास सांगू शकेल. यामुळे खासगी कंपन्यांना पुरेपूर संधी मिळेल. ज्या जबाबदाऱ्या पूर्वी एन्ट्रिक्‍सकडे होत्या, त्या आता एन-सिलकडे असतील.

इस्रोची कार्यसंस्कृती वेगळी आहे आणि इस्रोने मिळविलेले यशही अन्य संस्थांसाठी आदर्शवत आहे. अशा स्थितीत खासगी क्षेत्राला अंतरिक्ष क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी दिल्यास इस्रोसाठी ते महागात पडू शकेल, असे बोलले जाते. परंतु आपण खासगी उद्योगांना “अनुमती’ देत नसून, त्यांना “सक्षम’ करीत आहोत, हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. कोणताही संरचनात्मक बदल घडणार नाही. खासगी क्षेत्रावर अतिरिक्‍त कामाची जबाबदारी असेल. आपल्या गरजा खूप मोठ्या आहेत. ठराविक कालावधीत त्या गरजा पूर्ण करणे “इस्रो’साठी खूपच अवघड आहे. त्यामुळेच खासगी क्षेत्राचे सहकार्य घेऊन दोन्ही क्षेत्रे हातात हात घालून चालणार आहेत.

इन-स्पेसचे नेतृत्व कोणाकडे असेल, याबद्दलही बऱ्याच चर्चा आहेत. ही नियुक्‍ती इस्रोमधील व्यक्‍तीची असेल की बाह्य व्यक्‍तीची असेल, याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु इन-स्पेसच्या कार्यात तांत्रिक पैलूंचा समावेश असल्यामुळे तांत्रिक ज्ञान असलेली व्यक्‍तीच इन-स्पेसचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा आहे. अर्थात, यावर अद्याप बराच विचारविनिमय होणार आहे. इन-स्पेसचे नेतृत्व करणारी व्यक्‍ती इस्रोमधीलच असावी, अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने चर्चाही होणार आहेत. करोनाच्या साथीने अन्य क्षेत्रांप्रमाणेच इस्रोच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे, ही बाब खरी आहे; परंतु परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरच इस्रो आपले प्राधान्यक्रम ठरविणार आहे आणि त्यानुसार काम सुरू करणार आहे.

गगनयान, चांद्रयान-3 आणि आदित्य या मोहिमांवरही करोनाचा परिणाम झाला आहे; परंतु या मोहिमांच्या तारखा ठरविण्यासाठी झालेल्या कामाचा आढावा घेऊन बरीच चर्चा करावी लागणार आहे. एसएसएलव्ही म्हणजे लघु उपग्रह प्रक्षेपण यान सोडण्यासाठी याच वर्षाची तारीख निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, तेही परिस्थितीवर अवलंबून आहे. इस्रो पुढील मोहीम कधी हाती घेणार, हे परिस्थिती पाहूनच ठरविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.