मोदींना कॉंग्रेसने पुन्हा करून दिली राजधर्माची आठवण; लडाख मधील भाजप नगरसेवकांनीच चिनने भारतीय हद्दीत अतिक्रमण केल्याचे कळवले आहे – कपिल सिब्बल

 

 

नवी दिल्ली, – पंतप्रधान मोदींनी राजधर्म पाळावा आणि चिनी आक्रमणाच्या संबंधातील वस्तुस्थिती देशापुढे स्पष्टपणे कथन करावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. आज एका पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी ही मागणी करताना मोदींना पुन्हा राजधर्माची आठवण करून दिली आहे. गुजरात मधील दंगलींच्या काळात तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना अशी आठवण करून दिली होती.

सिब्बल यांनी यावेळी लडाख मधील पॅंगॉग त्सो तलावाच्या परिसरातील मे आणि जून मधील घुसखोरीची छायाचित्रेही सादर केली. चीनने त्या ठिकाणी काही पक्‍क्‍या स्वरूपाचे बांधकाम केले आहे, आता तरी खरे बोला आणि वस्तुस्थिती देशापुढे कथन करा अशी मागणी त्यांनी केली. चीनला लाल डोळे दाखवून भारतीय भूमीचे संरक्षण करण्याची हमी देत मोदी सत्तेवर आले होते निदान आता तरी त्यांनी लोकांना भ्रमीत करण्याचे काम थांबवले पाहिजे असे ते म्हणाले. आता चीनच्या डोळ्याला डोळ भिडवून त्यांना आव्हान देण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी चिनला भारतीय भूमीवरून काढता पाय घ्या असे स्पष्ट बजावले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. चीनला भारतीय हद्दीतून निघून जाण्यास सांगणे हाच पंतप्रधानांचा आजचा राजधर्म आहे आणि त्यांनी तो पाळला पाहिजे अशी देशाची अपेक्षा आहे असे ते म्हणाले.

यावेळी सिब्बल यांनी मोदींना पाच प्रश्‍न विचारले. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची जी उपग्रह छायाचित्रे प्रकाशित केली आहेत ती खरी आहेत का?, छायाचित्रे खोटे बोलू शकत नाहीत मग जमिनीवरील नेमकी हकिकत काय आहे? चीनने भारतीय हद्दीत रडार, हेलिपॅड, आणि अन्य बांधकामे उभारली आहेत हे भारतीय हद्दीतील अतिक्रमण नाही काय?, चीनने गलवान खोऱ्यातील फिंगर 14 पर्यंतची भूमी व्यापलेली नाहीं काय? हॉट स्प्रींग मधील भूमी चीनने अतिक्रमीत केली नाही काय? असे प्रश्‍न सिब्बल यांनी उपस्थित केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.