अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ‘ईडी’कडून पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडी या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी करू इच्छित आहे. दोघांनाही वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ED प्रथम 21 मार्चला अभिषेक बॅनर्जी यांची आणि त्यानंतर 22 मार्चला रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी करेल.
ममता बॅनर्जी यांचे भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना पुढील आठवड्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी त्यांना संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी या जोडप्याला यापूर्वी समन्स बजावण्यात आले होते.