पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पुणे शहर आणि कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती पाहता आता सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) याप्रकरणाची माहिती मागविली आहे. याबाबत ईडीने पुणे पोलिसांशी पत्रव्यवहार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ, सांगली परिसरात छापे टाकून तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. कुरकुंभ एमआयडीसीतील एका कंपनीत हे ड्रग्ज उत्पादन होत होते.
येथील कारवाईत भीमाजी साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ श्रीगोंदा) आणि युवराज भुजबळ (वय ४१, रा. डोंबिवली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय या प्रकरणात आजवर वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख आदी अटकेत आहेत. यातील मूख्य सुत्रधार हा संदीप धूनिया हा असून तो विदेशात फरार झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जची कारवाई झाल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने पुणे पोलिसांकडून याची माहिती घेतली. यानंतर आता ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालयाने देखील पुणे पोलिसांना पत्रव्यवहार केला असून, माहिती मागविली आहे. जप्त केलेल्या एमडीची अंतराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत आहे. त्यामुळे या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची शक्यता आहे.