पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग २ मधील कुदळवाडी, चिखली ३० मीटर डीपी रस्त्यामधील सुमारे २५ हजार चौरस फूट क्षेत्रातील दोन आरसीसी बांधकामे आणि एका वीट बांधकामासह पत्राशेडवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या अनधिकृत बांधकामांमुळे अरुंद झालेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी अनधिकृत बांधकामांबाबत कडक भूमिका घेतली आहे. मुख्य रस्त्यात येणारी अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करण्यात यावीत, असे आदेश त्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला दिले आहेत. त्यानुसार क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारी सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहेत. प्रभाग २ चिखली, कुदळवाडी परिसरातील सुमारे २५ हजार चौरस फूट वीट बांधकाम व पत्राशेडवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
शहराच्या विविध भागात दररोज अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यांवर बेवारस वाहने उभी करुन नयेत, तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड व बॅनर्स उभारु नये. तसेच, फूटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, महापालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार ही कारवाई केलेल्या ठिकाणी पालिका परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड किंवा बांधकाम करु नये, अशा सूचना देण्यात आल्या.