माले, (मालदीव) – चीनचे सागरी संशोधन करणारे उच्च तंत्रज्ञान असलेले एक जहाज मालदीवच्या किनार् यावर दाखल झाले आहे. मालदीवच्या जवळपास हिंद महासागरामध्ये सुमारे महिनाभर राहिल्यानंतर शियांग यांग होंग-०३ हे जहाज आज मालदीवच्या किनाऱ्यावर आले आहे.
मालदीव, श्रीलंका आणि भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांचा त्रिस्तरिय सराव मालदीवच्या समुद्रामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सरावासाठी श्रीलंका आणि भारताची जहाजे मालदीवला पोचत असतानाच चीनचे हे सागरी संशोधन जहाज देखील मालदीवला येऊन दाखल झाले आहे.
हिंद महासागरातील चीनच्या संशोधन जहाजाच्या हालचालींबद्दल भारताने यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती. या जहाजाला कोलोंबो बंदरात नांगर टाकण्याची अनुमती दिली जाऊ नये, अशी अपेक्षा श्रीलंकेकडे करण्यात आली होती.
मालदीवचे नवीन अध्यक्ष मुइझ्झू यांनी चीनचा दौरा संपवला त्यानंतर लगेचच १४ जानेवारी २०२४ रोजी शियांग यांग होंग-०३ या जहाजाने आपला प्रवास सुरू केला होता.
मालदीवच्या विशेष आर्थिक क्षेत्राजवळ महिनाभर रेंगाळल्यानंतर आज दुपारी या जहाजाने माले शहराजवळ नांगर टाकला. या कालावधीत ठावठिकाणा समजू नये म्हणून या जहाजाने ट्रॅकिंग सिस्टीम बंद करून ठेवली होती. या काळात हे जहाज इंडोनेशियाजवळ जावा समुद्रात होते, असा अंदाज आहे.
या जहाजावर सागरी संशोधनाचा डाटा संकलित केला जात असतो. यामध्ये लष्करी उपयोगाच्या माहितीचेही संकलन केले जात असते. विशेषतः पाणबुड्यांच्या ठावठिकाणा शोधला जात असल्याचे अमेरिकेच्या निरीक्षकांनी म्हटले आहे. मात्र चीनने हा हेरगिरीचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सागरासंबंधीच्या ठरावाला अनुसरूनच चीनच्या जहाजाचे काम केले जात असल्याचे चीनने म्हटले आहे. या जहाजाला मालदीवच्या किनाऱ्यावर येण्याची अनुमती मालदीवने २२ जानेवारीला दिली.
मात्र मालदीवच्या सागरी हद्दीत असताना या जहाजाला कोणतेही संशोधन करता येणार नाही, असे मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. या जहाजाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याचे भारतीय सुरक्षा दलांनी म्हटले आहे.
अवघ्या ७० सागरी मैलांचे अंतर
लक्षद्विपचे मिनिकॉय बेट आणि मालदीवदरम्यान अवघ्या ७० सागरी मैलांचे अंतर आहे. तर भारताच्या पश्चिम किनार् यापासूनचे अंतर ३०० सागरी मैलांचे आहे. व्यापारी वाहतुकीच्या मार्गामुळे अंडियन ओशन रिजन हा सागरी भाग संरक्षमदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो.
भारत, श्रीलंका आणि मालदीवच्या तटरक्षक दलाच्या जहाजांमध्ये दोस्ती-१६ हा सराव आजपासून २५ फेब्रुवारीपर्यांत चालणार आहे. या सरावाला बांगलादेश निरीक्षक असणार आहे. यामुळे चिनी जहाजाची उपस्थिती आक्षेपार्ह आहे.