पिंपरी – गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहज एका दुचाकीस्वाराकडे चौकशी केली आणि तो गडबडला. चौकशीत दुचाकीस्वाराने दुचाकी मारहाण करून लुटल्याची कबुली दिली. काळेवाडी येथे 29 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्यांची नोंद शनिवारी (दि. 6) वाकड पोलीस ठाण्यात झाली.
साहिल उर्फ पोट्ट्या दीपक सूर्यवंशी (वय 18, रा. रहाटणी फाटा, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. राहुल बाबासाहेब कुंभार (वय 32, रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी. मूळ रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा) यांनी शनिवारी (दि. 6) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी फिर्यादी राहुल त्यांच्या एमएच-14-एफडब्ल्यू-3056 या दुचाकीवरून काळेवाडी येथून जात होते. कुणाल हॉटेल जवळ आले असता त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि थोडा वेळ फूटपाथवर बसले.
त्यावेळी तिथे आरोपी साहिल आला. त्याने राहुल यांना मारहाण करुन 70 हजारांची होंडा शाईन दुचाकी, पाच हजारांचा मोबाइल फोन आणि साडेसहा हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 81 हजार 500 रुपयांचा माल चोरून नेला. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालत असताना आरोपीस पकडले.