पोर्ट हार्डी – कॅनडाच्या पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबिया या भागाच्या किनारपट्टीला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी होती, असे युएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे. सकाळी 8.36 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू अंदाजे 4 हजार लोकवस्तीच्या पोर्ट हार्डीच्या पश्चिमेला 182 किलोमीटरवर जमिनीखाली 10 किलोमीटरवर होता, असेही या एजन्सीने म्हटले आहे. या भूकंपाची तीव्रता जरी खूप जास्त असली तरी त्यामुळे त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता नसल्याचे अलास्का येथील नॅशनल त्सुनामी सेंटरने म्हटले आहे.
सोमवारी ब्रिटीश कोलंबिया भागाला 5 वेगवेगळे भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता 4.8 ते 6.0 इतकी नोंदली गेली होती. या 5 धक्क्यांपैकी 4 धक्के प्रामुख्याने वॅनकुवर बेटाच्या परिसरात आणि व्हिक्टोरिया बेटाच्या उत्तरेच्या टोकावरील पोर्ट ऍलिस आणि पोर्ट हार्डीच्या दरम्यान जाणवले होते, असे कॅनडा सरकारच्या “अर्थक्वेक कॅनडा’या वेबसाईटने म्हटले आहे. वेबसाइटने म्हटल्यानुसार व्हॅनकुव्हर बेटावर सोमवारी सकाळी 8:44 वाजता 5.1 तीव्रता, सकाळी 11:13 वाजता 5.6 तीव्रता, सकाळी 11:49 वाजता 5.8 तीव्रता, दुपारी 12:56 वाजता 6.0 तीव्रता आणि दुपारी 3:38 वाजता 4.8 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.
याव्यतिरिक्त, व्हिक्टोरियातील वायव्येकडील मोरेस्बी बेटावरील क्वीन शार्लोट व्हिलेज येथे सोमवारी रात्री 9:32 वाजता 4.3 तीव्रतेचा भूकंप नोंदविला गेला होता.