Earthquake Updates : नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांत भुकंपाचे धक्के

मुंबई – हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागाला आज रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या ईशान्य भागात सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी तर हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले.  रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

राष्ट्रीय भूंकपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हे भूकंपाचे धक्के १० किलोमीटर खोलवरून बसले. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हा भूकंप जवळ असल्यामुळे त्याची तीव्रता अधिक जाणवते. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. मात्र या भूकंपाचे धक्के यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागातील लोकांना अधिक तीव्रतेने जाणवले. या भूकंपाचा केंद्र बिंदू यवतमाळजवळ होता.

या भूकंपाचे धक्के उमरखेड, पुसद, दिग्रस, कळमनुरी तालुक्यातही जाणवले. अनसिंग, दारव्हा, हिंगोली या ठिकाणीही या भूकंपाचे धक्के जाणवले.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात अधून मधून भूकंपाचे धक्के जाणवतच असतात. परंतु आज सकाळी जाणवलेला भूकंपाचा धक्का आजपर्यंतचा भूकंपाच्या धक्क्यांपेक्षा तीव्र होता. वसमत तालुक्यातील  पिंपळदरी, कुरूंदा, आमदरी,पांगरा शिंदे परिसर, कोथळज, औंढा नागनाथ तालुका आणि हिंगोली तालुक्यातील काही गावांत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोली शहराच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

स्वामी रामानंमद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील Swami Ramanand Thirth Marathwada University डाॅ. टी. विजयकुमार नांदेडमध्ये बसलेल्या सौम्य धक्क्यांविषयी माहिती घेत आहेत. दोन्ही ठिकाणी भूकंपाची एकच वेळ दाखवत असल्याने माहिती मिळण्यास अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नांदेडमध्येही आज सकाळी 8:33 मि. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.