Sharad Pawar on legislative assembly chairman – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामती येथील आपल्या गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी यावेळी केंद्र सरकारने नव्याने तयार केलेलं सहकार खातं, विधानसभा अध्यक्षपद, समान नागरी कायदा या महत्वपूर्ण विषयांवर भाष्य केलं.
दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतर ही जागा रिक्त आहे. त्यामुळे, विधानसभा अध्यक्षपदी नक्की कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशातच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी अध्यक्षपदाबाबत वक्तव्य केल्याने याबाबतचा संभ्रम वाढला होता. मात्र आज शरद पवार यांनी याबाबत वक्तव्य करत याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? शरद पवार म्हणाले…
विधानसभेच्या अध्यक्षपदावर भाष्य करताना पवार म्हणाले की, आमच्या तीन पक्षाचा स्वच्छ निर्णय झाला आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष पद काँग्रेसकडे होतं आणि ते कॉंग्रेसकडेच राहणार. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. निर्णयावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे याबाबत कोणीही काही बोलायचा संबंध येत नाही. असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
केंद्र काय करते याकडे लक्ष
समान नागरी कायद्यावर बोलताना पवार म्हणाले की, केंद्र सरकार जोपर्यंत समान नागरी कायदा बाबत काही भूमिका घेत नाही. तोपर्यंत भाष्य करणे योग्य होणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. ते काय करतात. यावर आमचं लक्ष आहे.असेही पवार म्हणाले….