पृथ्वी शॉचे तडाखेबाज द्विशतक

मुंबई: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉने दमदार द्विशतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने बडोद्याविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व राखले असून त्यांना विजयाची संधी आहे. उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यानंतर शॉ याच्यावर बंदी लावण्यात आली होती. बंदीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याने दिमाखात पुनरागमन केले. विजय हजारे तसेच सय्यद मुश्‍ताक अली स्पर्धेतही त्याने दमदार फलंदाजी केली.

रणजी स्पर्धेसाठी मुंबई संघात परतलेल्या पृथ्वीने बडोद्याविरुद्धच्या सलामीच्या लढतीत तिसऱ्या दिवशी द्विशतक साकार केले. पहिल्या डावात 62 चेंडूत 66 धावांची खेळी करणाऱ्या पृथ्वीने दुसऱ्या डावात 175 चेंडूत द्विशतक फटकावले. त्यात 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. द्विशतक झाल्यानंतर पृथ्वी बाद झाला. त्याने 179 चेंडूत 202 धावांची खेळी केली. मुंबईने पहिल्या डावात 431 धावा केल्या, तर बडोद्याचा पहिला डाव 307 धावांत संपवत मुंबईने पहिल्या डावात आघाडी घेतली.

मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात पृथ्वीचे द्विशतक व कर्णधार सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर 4 बाद 409 धावांवर डाव घोषित केला व बडोद्यासमोर पाचशेपेक्षा जास्त धावा करण्याचे आव्हान ठेवले. बडोद्याचा दुसरा डाव आज चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 3 बाद 74 असा संकटात सापडला असून मुंबईच्या निर्णायक विजयाची उद्या केवळ औपचारिकता असेल. विजयासाठी मुंबईला 7 बळींची तर बडोद्याला 460 धावांची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.