राजकारणातील गरूडझेप

अश्‍विनी बोबडे

तू नेहमी दिलेस बळ,
समजला अर्थ जगण्याचा…!
सांगेन जगाला अर्थ मी
तुझ्या या “असण्याचा’…!!

पती-पत्नीच्या सुंदर नात्यात जेव्हा या चार ओळीनुसार जगणं सुरू होतं, तेव्हा ते नातं अधिक दृढ होऊन बाकीच्या नात्यांना सुदृढ बनवत जातं. एकाच क्षेत्रात खांद्याला खांदा लावून एकमेकांसोबत काम करताना अनेक जोडप्यांना आपण पाहतो. पण एकाच क्षेत्रात काम करणाऱ्यांचे विचार एक राहतीलच याची खात्री नसते. त्यातही राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचे एकमेकांशी सुसंवाद कमी अन्‌ वादच जास्त.

मात्र, या गृहितकांना खोटे ठरवणारे असेच एक राजकीय क्षेत्रातील जोडपे आपण पाहू शकतो. भीमा बोबडे आणि त्यांच्या पत्नी अश्‍विनी बोबडे हे असे दाम्पत्य आहे, ज्यांच्या नात्याकडे पाहून “कोण जास्त समजूतदार’ असा प्रश्‍न पडावा. एकमेकांना समजून घेत, अडी-अडचणीत एकमेकांच्या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहणाऱ्या या जोडप्याचा आदर्श घ्यावा असाच आहे. समंजस पतीच्या भक्‍कम पाठिंब्यामुळे अश्‍विनीताईंनी लग्नानंतर पदवी मिळवली, राजकारणात प्रवेश केला आणि नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या उत्तम कामगिरीमुळे आणि पतींच्या पाठिंब्यामुळे महानगरपालिकेच्या विधी समितीच्या सभापतीही झाल्या.

अश्‍विनी बोबडे यांचा विवाह झाला, त्यावेळी अवघे दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. सासरी राजकीय वातावरण असल्यामुळे राजकारणाची आवड त्यांना आपोआपच लागली. पुढे घरसंसार सांभाळून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आज त्या राजकारणामध्ये यशस्वी होत पिंपरी- चिंचवड महापालिकेतील विधी समितीच्या सभापती झाल्या आहेत. यामध्ये त्यांना त्यांचे पती भीमाभाऊ बोबडे यांची खंबीर साथ होती. सन 1994 साली अश्‍विनी यांचा विवाह भीमाभाऊ बोबडे यांच्याशी झाला. भीमाभाऊ हे राजकारणामध्ये पहिल्यापासूनच सक्रीय होते. सन 2007 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यामुळे घरामध्ये राजकीय वातावरण होते.

अश्‍विनीताईंनी घऱ सांभाळून अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतली. शिक्षण सुरू असताना त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. पती भीमाभाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून त्या राजकारणात उतरल्या. प्रभागातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांची त्यांनी आखणी केली. त्यातून महिलांची मोट त्यांनी एकत्र बांधून ठेवली. महिलांसाठी बचतगटाच्या माध्यमातून विविध रोजगार निर्माण करून दिले. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे अल्पावधीत त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळू लागला. घरकुल योजनेच्या वेळी त्या नागरिकांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. नागरिकांना योजना समजावून सांगितली. त्यांचे अर्ज भरून घेतले. त्यामाध्यमातून अनेक नागरिकांना त्यांनी घरकुलमध्ये हक्काचे घर मिळवून दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीमध्ये त्या चिखलीमधून निवडून आल्या. कामाच्या जोरावर त्यांनी तब्बल दहा हजार मते जास्त मिळवून विजय मिळविला. अश्‍विनीताई जिंकून आल्यानंतर त्यांना नागरिकांनी टाकलेला विश्‍वास सार्थक करायचा होता. त्यामुळे त्यांनी प्रभागामध्ये जोरदार कामाला सुरूवात केली. नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. प्रभागातील नागरिकांना एकत्र बांधून ठेवण्याची किमया त्यांनी साधली. त्या माध्यमातून त्यांनी विविध कामांना मूर्त स्वरुप दिले. प्रभागामध्ये साई मंदिर व विठ्ठल मंदिर बांधले.

एसआरए योजनेअंतर्गत आजपर्यंत देशामध्ये कुठेही झोपटपट्टीधारकांना वन बीएचके घर कोणी दिले नाही. या योजनेला मूर्त स्वरुप आणण्याचे काम अश्‍विनी बोबडे यांनी केले आहे. त्या शरदनगर मधील झोपडपट्टीधारकांना वन बीएचके घर देणार आहे. त्याचे काम सद्या सुरू आहे. अश्‍विनी नगरसेविका झाल्यानंतर प्रभागामध्ये विकासाचे वारे वाहू लागले. रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यांनी प्राधान्याने सोडविली. प्रभागातील नागरिकांना रस्ते, वीज. स्वच्छ पाणीपुरवठा कसा मिळेल, यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले.

त्यामुळे अल्पावधीतच प्रभागाचा कायापालट झाला. अश्‍विनीताई सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीवर सभापती म्हणून कार्यरत आहेत. पती भीमाभाऊ बोबडे यांच्या साथीने त्या राजकारणाची एक पायरी यशस्वीपणे चढत आहे. त्यांच्या या कार्यामध्ये पती सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. शहरातील नागरिकांसाठी अनेक चांगल्या योजना आणण्याची त्यांची इच्छा आहे. त्यानुसार त्या काम करत आहेत. ज्या जनतेने त्यांना निवडून दिले आहे, त्यांची मनोभावे कामे करायची या न्यायाने त्या पुढे जात आहेत. त्यांनी राजकारणात घेतलेली ही गरुडझेप उल्लेखनीय आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.