नाही, माझ्या लेखाची सुरुवात मी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन नाही, तर तुम्हाला एक प्रश्न विचारून करेन.
हेच ते वातावरण आहे का जे तुम्ही तुमच्या आईसाठी, बायकोसाठी, मुलीसाठी, मैत्रिणीसाठी किंवा प्रेयसीसाठी इच्छिता? हा प्रश्न फक्त पुरुषांना नाहीये तर स्त्रियांना देखील आहे. वातावरणाचा संबंध इथे प्रदूषणाबद्दल नाही, तर वातावरणाचा संबंध स्त्रियांना आज समाजामध्ये दिली जाणारी वागणूक (चांगली /वाईट), स्त्रियांचे असणारे हक्क (खूप कमी /प्रमाणात /खूप जास्त), इतकेच नव्हे तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची आणि शक्तीचे असणारे जाणीव (खूप कमी /प्रमाणात / प्रमाणापेक्षा जास्त).
माझ्या मताप्रमाणे आपल्या देशात तीन प्रकारचे वातावरण आहेत.
पहिले जिथे स्त्रियांना त्यांच्या हक्कांची आणि शक्तीची माहिती खूपच कमी आहे. त्यामुळे त्या प्रकारच्या वातावरणात त्यांच्यावर अजूनही अत्याचार होत आहेत. जर अशा प्रकारच्या वातावरणात तुम्ही असाल तर हे तुमचे कर्तव्य आहे की अशा स्त्रियांना त्यांच्या हक्कांची आणि शक्तीची जाणीव करून देणे. तसे पाहिले तर सर्व स्त्रिया शक्तिशाली असतातच हो, पण हक्कांची जाणीव शक्तीचा योग्य वापर करण्याचे बळ देते.
दुसरे वातावरण जिथे स्त्रियांना त्यांच्या शक्तीची माहिती त्याचे ज्ञान पुरेसे आहे. ज्यामुळे त्यांना समाजात मान आहे आणि त्या स्त्रिया स्वतःच्या प्रगतीसाठी आणि बरोबरीने स्वतःच्या कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहेत.
तिसरे वातावरण जिथे स्त्रियांना त्यांच्या हक्कांची आणि शक्तीची जाणीव किंवा माहिती प्रमाणापेक्षा जास्त आहे. ज्यामुळे आपण खूप ठिकाणी पाहतो की काही स्त्रिया आपल्या हक्कांचा आणि त्यांच्या बाजूने असणाऱ्या कायद्यांचा गैरवापर आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी करताना दिसतात.
हे तीनही प्रकारचे वातावरण आपल्या समाजामध्ये आहेत, हे तुम्ही नाकारु शकत नाही. फरक फक्त एवढाच आहे की कोणी फक्त एका वातावरणाबद्दल बोलतो तर बाकीचे सोडून देतो. आता हे सर्व प्रकारचे वातावरण तुमच्यासमोर असताना तुम्ही स्वतःला, तुमच्या वागण्याला, तुमच्या कामाला कोणत्या प्रकारच्या वातावरणात बघता? जर तुमचे वागणे किंवा तुमचे काम तुम्ही तुमच्या आई, बायको, मुलीसाठी इच्छित असलेल्या वातावरणाशी निगडीत आहे, तर तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पण तुमचे काम किंवा तुमचे वागणे तुम्ही इच्छित असलेल्या वातावरणाशी विसंगत आहे तर ते येणाऱ्या दिवसांमध्ये सुसंगत कसे होईल यावर काम करा जेणेकरून पुढच्या वर्षीच्या महिलादिनी तुम्हाला पण शुभेच्छा मिळतील.
– अनि__रूध्द