निशा पिसे
अहमदनगरच्या मातीत घडलेल्या स्मिता झगडे यांना आपण पुढे प्रशासकीय सेवेत जाऊ, असे कधीही वाटले नाही. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून त्या पदवीधर झाल्या. त्यानंतर त्यांनी राज्य सेवेचा पर्याय निवडला.
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीतून एमपीएससीचा अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळविले. महसूल खात्यात त्यांना पहिली संधी मिळाली.
पुण्यामध्येच 2007 साली त्या नायब तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. मुळशी, खेड, हवेली या तीन तालुक्यांचे काम त्यांनी पाहिले. 2009 मध्ये पुन्हा त्यांनी क्लासवन पदासाठी परीक्षेची तयारी केली. त्यावेळी त्या गरोदर होत्या. मात्र, परीक्षा देण्याच्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या. सीईओ म्हणून त्यांना मुंबईला पोस्टींग मिळाले. मुलगा आठ ते नऊ महिन्यांचा असताना त्याला घरच्यांकडे सोपवून त्यांनी दररोज पुणे ते मुंबई असा रेल्वे प्रवास केला.
यानंतर अहमदनगर महापालिकेत उपायुक्त म्हणून त्यांची बदली झाली. यावेळी त्यांच्याकडे करसंकलन विभाग होता. “रेकॉर्ड ब्रेक’ जप्ती, वसुली त्यांनी करुन दाखविली. पुणे विभागीय आयुक्तालयात सहाय्यक संचालक, मुंबईत अर्बन डेव्हलपमेंट विभागात स्वच्छ महाराष्ट्र सेलमध्ये मराठवाड्यासाठी काम करीत दुसरा रॅंक मिळवून दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरुवातीला नागर वस्ती विभागात काम करताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. लाभार्थ्यांना धनादेशाऐवजी थेट बॅंक खात्यात लाभ, शिवणयंत्र, सायकलसाठी जीएसटी पावती बंधनकारक केली.
लाभार्थ्यांची संख्या 20 टक्क्यांपर्यंत वाढविली. सुमारे 85 टक्क्यांपर्यंत बजेट खर्ची केले. नागरवस्ती विभागाच्या योजनांची माहिती घरबसल्या मिळावी, यासाठी मोबाईल ऍप विकसित केले. महिलांसाठी डिजिटल साक्षरता वर्ग तसेच लैंगिक शिक्षणासाठी “अर्श’ उपक्रम हाती घेतला.
सध्या त्यांच्याकडे कर संकलन विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर स्मिता झगडे यांची बदली होईल. पुन्हा नवीन ठिकाणी, नवीन विभागात स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज होतील. मात्र, पिंपरी महापालिकेच्या इतिहासात त्यांनी केलेल्या कामगिरीची चर्चा कायम होत राहणार यात शंका नाही. माझ्या आजवरच्या प्रवासामागे माझे आई-वडील प्रेरणा राहिले आहेत. माझे पती, सासरे यांच्यामुळे मी नोकरीच्या ठिकाणी “डेडीकेशन’ ने कर्तव्य बजावू शकत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासकीय सेवेत महिला अधिकारी नवीन नाहीत. परंतु, कुटुंब आणि नोकरी असा तोल सांभाळत स्वतःला सिद्ध करणाऱ्या महिला अधिकारी नगण्यच. ज्या विभागात सेवेची संधी मिळते. त्याठिकाणी अनेक नवनवीन संकल्पना राबवून आपले कर्तव्य चोख बजावण्यात त्या कोणतीही कसूर ठेवत नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत करसंकलन विभागात सहायक आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या स्मिता झगडे अशापैकी एक.
शासकीय सेवेत महिला अधिकारी नवीन नाहीत. परंतु, कुटुंब आणि नोकरी असा तोल सांभाळत स्वतःला सिद्ध करणाऱ्या महिला अधिकारी नगण्यच.
ज्या विभागात सेवेची संधी मिळते. त्याठिकाणी अनेक नवनवीन संकल्पना राबवून आपले कर्तव्य चोख बजावण्यात त्या कोणतीही कसूर ठेवत नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत करसंकलन विभागात सहायक आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या स्मिता झगडे अशापैकी एक.