मुंबई – शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदाने ठरवण्यात आली होती. पण हा मेळावा आता आझाद मैदानावर घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दसऱ्याच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी यंदादेखील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवाजी पार्क मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण शिंदे गटाने माघार घेत हा मेळावा दुसऱ्या मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर दसरा मेळावा आता कुठे घ्यायचा यावर पक्षामध्ये बरीच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर क्रॉस किंवा आझाद मैदान या दोन मैदांनांचा विचार करण्यात आला. त्यानंतर आझाद मैदानावर शिंदे गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कात –
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षात देखील ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे. मागील वर्षी देखील मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण त्यावेळी देखील ठाकरेंनाच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्काचं मैदान मिळाले होते. तर शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक काम सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हते.