संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येत्या शुक्रवारी (दि. 20) सकाळी 10 वा. आ. बाळासाहेब थोरात व कांचन थोरात यांच्या हस्ते व माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, ऍड. माधवराव कानवडे यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.
थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात 10 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप केले आहे. कारखान्याने यावर्षी कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादकांना सर्वाधिक 2 हजार 835 रुपये भाव दिला आहे.
हे वर्ष अमृत उद्योगसमूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असून, यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजनही केले आहे.
गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाची शुक्रवारी कारखान्याचे संचालक मीनानाथ वर्पे व त्यांच्या पत्नी हिराताई वर्पे, डॉ. तुषार दिघे व त्यांच्या पत्नी सुरेखा दिघे, माणिकराव दाजीबा यादव व त्यांच्या पत्नी लताताई यादव, संभाजी वाकचौरे व त्यांच्या पत्नी सिंधुताई वाकचौरे, संचालिका मंदाताई वाघ व शेखर वाघ यांच्या हस्ते पूजा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.