नगर -अकोले तालुक्यातील निळवंडे येथे प्रवरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या निळवंडे धरणाचे 2014 पर्यत जवळपास 13 टक्के खोदकाम आणि 8.23 टक्के भराव काम झाले होते. महाविकास आघाडीने या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत 16 लक्ष 38 हजार क्युबिक मीटर खोदकाम आणि 14 लक्ष 56 हजार क्युबिक मीटर भराव काम झाले आहे.
गेल्या सरकारपेक्षा या सरकारने निळवंडे धरणाचे काम वेगाने पूर्ण होत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. नगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या चालू असलेल्या कामांचा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज आढावा घेण्यात आला. बैठकीला उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, विशेष प्रकल्प, पुण्याचे मुख्य अभियंता एस.टी.धुमाळ, नगरचे अधीक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक अ.रा.नाईक, नाशिकच्या अधीक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक अ.ह.अहिरराव, नगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता का.ल.मासाळ, नगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नोर, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, कुकडी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील शिंदे, लघु पाटबंधारे क्रमांक दोन विभागाच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप उपस्थित होते.
जिल्हयातील प्रलंबित प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सीना नदीची निळी रेषा आणि लाल रेषा आखण्यात आली असून त्यात सुधारणा करण्याचे काम सुरु असल्याचे तसेच नदीपात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
अकोले मतदारसंघातील उच्च पातळीच्या कॅनॉलचे बांधकाम, पश्चिमकडे वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी वळण बांधाऱ्यांचे काम करणे, श्रीरामपूरातील प्रवरा कालव्याची डागडुजी करून त्याची वहनक्षमता वाढविणे, बंद पद्धतीने कॅनॉल बांधकाम करणे, मुळा नदीवरील कवठे गावाचा सतत फुटणाऱ्या कालव्याची दुरुसती करणे, पुररेषा नदीपात्राच्या बाहेरून नेणे, नद्यांमधील पाणी नदीपात्र सोडून बाहेर जाऊ नये यासाठी नदी खोलीकरण आदी कामांचा यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला आणि सदरहू कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पुलाच्या बांधकामाला मंजुरी
– आढळा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपये, देसवंडे येथे कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा बांधणे, वावरस परिसरातील मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पुलाचे बांधकाम करणे आणि गोदावरी नदीवरील 84 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.